राज्यातील शेती व्यवसायाला भाजप सरकारकडून धोका : शंकरअण्णा धोंडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:14 PM2017-09-01T17:14:03+5:302017-09-01T17:14:41+5:30
सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू केल्याची माहिती या अभियानाचे निमंत्रक केशवअण्णा धोंडगे यांनी दिली.
परभणी, दि. 1 : सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू केल्याची माहिती या अभियानाचे निमंत्रक केशवअण्णा धोंडगे यांनी दिली.
राज्यात शेती आणि शेतकरी असुरक्षित झाली आहे. शासनाच्या धोरणांमुळे शेतक-यांची आर्थिक फरफट होत आहे. शेतक-यांना अस्थिर करायचे आणि कालांतराने कार्पोरेट शेती विकसित करायची, असा शासनाचा डाव असल्याचे सध्याच्या स्थितीवरुन दिसते. कारण गरज नसताना शेतीमालाची आयात करणे, विदेशात जमिन किरायाने घेऊन तेथे शेती मालावर प्रक्रिया करणे यासारखे निर्णय हे शासन घेत आहे. देशात शेतीमालाचे दर निच्चांकी ठेवण्यावर शासनाचा भर आहे. या सर्व धोरणांमुळे शेती व्यवसायालाच सरकारकडून धोका निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत शेतक-यांना धीर देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून सरकारविरोधी लढा उभारण्यासाठी ९ आॅगस्टपासून हे अभियान सुरू केले असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. शेती व्यवसायाला संरक्षण द्यावे, शेतमालाचे भाव ठरविणा-या आयोगाला वैधानिक दर्जा द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आतापर्यंत राज्यात २३ ठिकाणी सभा घेतल्या असून, या अभियानात सत्ताधारी, विरोधी अशा शेतक-यांवर प्रेम करणा-या सर्वांनाच सामावून घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध मागण्या आम्ही शासनासमोर ठेवल्या आहेत.
सरकारला वठणीवर आणण्यासाठी २ आॅक्टोबरनंतर राज्यभरात शेतक-यांचे असहकार आंदोलन केले जाणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी खा.गणेशराव दुधगावकर, महंमद गौस, राकाँ किसान सभेचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, संतोष देशमुख, सुमंत वाघ, नंदू शिंदे, मंचकराव बचाटे, साथी रामराव जाधव, आदींची उपस्थिती होती.