बहरलेला कापूस, सोयाबीनची माती; परभणी जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील पिके बाधित
By मारोती जुंबडे | Published: September 3, 2024 06:26 PM2024-09-03T18:26:24+5:302024-09-03T18:30:24+5:30
कृषी विभागाचा अहवाल : नदी काठावरील शेतांमध्ये सर्वाधिक नुकसान
परभणी : रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत जिल्ह्यात १३८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. ५२ पैकी ५० मंडळात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने जिल्ह्यात २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे.
दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पाथरी मंडळात तर जणू काय अभाळ फाटल्याची स्थिती निर्माण झाली. २२९ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. या पावसाने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. त्यामुळे या पुराचे व पावसाचे पाणी अनेकांच्या शेतामध्ये शिरले. या पाण्यामुळे सोयाबीन, तूर व कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी चिंताग्रस्त झाले असताना नेमके अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले, याचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आला. त्यानुसार अहवाल ही तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार दि. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे २ लाख ९८ हजार ३५६ हेेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना शासन काय मदत करते? याकडे जिल्ह्यातील बळीराजांचे लक्ष लागले आहे.
परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर बाधित
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या अहवालामध्ये २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील ८३ हजार ८९ हेक्टर क्षेत्रापैकी ६२ हजार ३१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पूर, अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
असे झाले तालुकानिहाय नुकसान
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी तालुक्यात सर्वाधिक ६२ हजार ३१६, गंगाखेड २७ हजार, सोनपेठ १६ हजार ८१, पालम २९ हजार ९४०, पाथरी ३२ हजार ६१६, मानवत २६ हजार ११५, जिंतूर ३९ हजार ४८९, पूर्णा २७ हजार ५९५, तर सेलू तालुक्यात ३७ हजार २१० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत.
पालकमंत्र्यांना वेळ मिळेना
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी ही पिके वाढविली होती. मात्र सोमवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस पिके मातीमोल झाली आहेत. परंतु, अद्यापही पालकमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला नाही किंवा पालकमंत्र्यांना परभणीत येण्यास वेळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.