भरधाव कारच्या धडकेत लाडके बैल 'सर्जा-राजाचा' मृत्यू; शेतकरी पिता-पुत्र थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:52 AM2023-03-09T11:52:53+5:302023-03-09T11:55:31+5:30
भरधाव कारच्या धडकेत बैलगाडी चकनाचूर झाली, एक बैल २० फुट दूर फेकला गेला
पाथरी - शेतातून चारा घेऊन येत असलेल्या बैलगाडीचा आणि नांदेडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरधाव कारचा भीषण अपघात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पाथरी पोखरनी रस्त्यावर पोहेटाकळीजवळ झाला. यात दोन्ही बैल ठार झाले .तर बैलगाडी चालक शेतकरी आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहेत. अपघात ऐवढा भीषण होता की धडकेमुळे एक बैल बैलगाडीपासून २० फुट दूर फेकला गेला.
पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील भागवत रोहिदास गिराम आणि वैभव भागवत गिराम हे बैलाला चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडी घेऊन गेले होते. रात्री 8.30 ते 9 वाजेच्या सुमारास बैलगाडीत चारा घेऊन दोन्ही पिता-पुत्र घरी परतत होते. दरम्यान, नांदेडहून छत्रपती संभाजीनगरकडे एका कार भरधाव वेगात जात होती. पोहेटाकळी जवळ बैलगाडी आणि कारची जोरदार धडक झाली. यात एक बैल तब्बल 15 ते 20 फूट दूर जाऊन फेकला जाऊन जागीच गतप्राण झाला. तर दुसरा बैल गंभीर जखमी होता. त्याचा देखील उपचार सुरु असताना मृत्यू झाला. भीषण अपघातात बैलगाडी चकनाचूर झाली आहे. बैलगाडी चालक शेतकरी भागवत रोहिदास मगर आणि वैभव मगर हे दोघेही यात जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अपघातस्थळी पोलिसांनी धाव घेतली.