पालम बाजार समितीची दोन्ही पदे बिनविरोध; सभापतीपद राष्ट्रीय समाज पक्षाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 03:17 PM2023-05-23T15:17:25+5:302023-05-23T15:18:32+5:30
पालम बाजार समिती निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलने 18 पैकी 14 जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
पालम: बाजार समितीच्या सभापतीपदी अपेक्षेनुसार गजानन गणेशराव रोकडे यांची निवड झाली असून अपेक्षितरित्या उपसभापतीची माळ भाऊसाहेब शिवाजीराव पौळ यांच्या गळ्यात पडली. उभयतांच्या निवडी बिनविरोध झाल्या असून अवघ्या तासाभरात निवडणूक प्रक्रिया आटोपली. तदनंतर फटाक्यांची अतिषबाजी करीत पालम शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
पालम बाजार समिती निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलने 18 पैकी 14 जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यात शिवसेनेच्या 3 संचालकांनी बाजी मारली होती. तत्पुर्वीच, सभापतीपती पदाचे उमेदवार म्हणून गजानन रोकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याप्रमाणे उपसभापती देखील रासपचा होईल, अशी चर्चा होती. त्यानुसार उपसभापतीपदासाठी रासपकडून दोघांनी मोर्चेबांधणी केली होती. तोपर्यंत शिवसेना स्पर्धेत नव्हती आणि त्यांना उपसभापतीपद देण्याचे ठरले नव्हते. तरीही शिवसेनेने अखेरच्या चार दिवसांत प्रतिष्ठा पणाला लावली. त्यासाठी मंबई येथून ताकत लावल्याने पौळ यांची लॉटरी लागली.
वास्तविक, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि रासप प्रदेश उपाध्यक्ष गमेशराव रोकडे यांचा संचालकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत सिंहाचा वाटा आहे. तरीही मंगळवारी सकाळी विशेषसभेत पुर्वनियोजितरित्या रासपचे गजानन रोकडे यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यासोबत शिवसेनेकडून शिवसेनेचे भाऊसाहेब पौळ यांनी उमेदवारी दाखल केली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज आले. म्हणून अध्यासी अधिकारी किशन फिस्के यांनी सभापतीपदी गजानन रोकडे तर उपसभापतीपदी भाऊसाहेब पौळ यांची बिनविरोध निवड केली.
अध्यासी अधिका-यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी विजय देखणे, सचिव आत्माराम महेंद्रकुमार रोहिणीकर यांनी सहाय्य केले. विशेष सभेला रासपचे संचालक प्रल्हाद विक्रम कराळे, शामराव दत्तराव काळे, मोतीराम रावसाहेब खंडागळे, रमेश माधवराव गायकवाड, ज्योती दिपेंद्र पाटील, महादेव नागनाथ खेडकर, डॉ. रामराव किशनराव उंदरे, अतुल रामचंद्र धुळगुंडे, भारत प्रभाकर सिरस्कर, ज्ञानेश्वर पांडुरंग घोरपडे, शिवसेननेचे गणेश विठ्ठलराव हत्तीअंबिरे, छायाबाई शिवाजी राऊत आणि महाविकास आघाडीचे तुषार काशिनाथराव दुधाटे, कमलबाई किशनराव काळे, विष्णूदास नारायणराव शिंदे, दिपक रामराव रुद्रावार उपस्थित होते.
निवडीनंतर सभापती व उपसभापतीच्या निवडीवेळी जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, माजी खासदार एड. सुरेशराव जाधव, लोहा भाजपचे नेते एकनाथ पवार, पाथरीचे उपनगराध्यक्ष रासवे, शिवसेनेचे नेते असेफ खान, नगरसेवक बालासाहेब रोकडे, लालखाँ पठाण, अप्पासाहेब केरवाडीकर, खरेदी विक्री संघाचे संचालक विजय घोरपडे, माधवराव गिनगिने, गटनेते लोंढे उपास्थित होते.