एक वर्षासाठी दोघे जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:39+5:302021-06-29T04:13:39+5:30
वारंवार गुन्हेगारी कृत्य करणे, सर्वासामान्य नागरिकांना त्रास होईल, या पद्धतीने वर्तणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून हद्दपारीची कारवाई केली जाते. येथील ...
वारंवार गुन्हेगारी कृत्य करणे, सर्वासामान्य नागरिकांना त्रास होईल, या पद्धतीने वर्तणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाकडून हद्दपारीची कारवाई केली जाते.
येथील शैलेश ऊर्फ बाज्या किरण कांबळे हा जबरी चोरी करण्याच्या प्रवृत्तीचा व शरीराविरुद्धचे गुन्हे करणारा असल्याने त्याची दहशत पसरली होती. कोतवाली पोलिसांनी ८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार त्यास हद्दपार करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी २४ जून रोजी निर्णय घेतला असून हा प्रस्ताव पारित केला आहे. त्यामुळे शैलेश कांबळे यास एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
याच पोलीस ठाण्यांतर्गत सोनूसिंग पूनमसिंग टाक याच्याविरुद्ध देखील हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रकरणातही उपविभागीय दंडाधिकारी डाॅ.संजय कुंडेटकर यांनी सोनूसिंग पूनमसिंग टाक यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी त्यास परभणी जिल्ह्याबाहेर सोडले असल्याची माहिती दिली.
दोन आठवड्यांपूर्वीच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीच्या हद्दपारीचे आदेश काढण्यात आले होते. आता आणखी दोन आदेशाची यात भर पडली आहे.
बैल चारण्यावरून एकास मारहाण
जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील विठ्ठल सखाराम काळे यांच्या शेतात बैल चारण्याच्या कारणावरून झालेल्या वादात विठ्ठल काळे यांना जबर मारहाण झाली. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात चार जणांवर २८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विठ्ठल काळे यांनी जिंतूर पोलिसात फिर्याद दिली.
२२ जून रोजी तात्याराव कुंडलिकराव मुंडे यांना आपण तुमचे जनावरे आमच्या शेतातील पिकांचे नुकसान करीत आहे, अशी विचारणा केली असता तात्याराव मुंडे, संजय तात्याराव मुंडे, सखूबाई तातेराव मुंडे, रत्नमाला तात्याराव मुंडे यांनी विठ्ठल काळे यांना शिवीगाळ करून दात पाडले. यावरून ४ आरोपींविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कर्मचारी संगीता वाघमारे करीत आहेत.
पेडगावमध्ये गुटखा पकडला
परभणी तालुक्यातील पेडगाव येथे २८ जून रोजी पोलिसांनी छापा टाकून गुटखा जप्त केला आहे. पेडगाव परिसरात गस्त घालीत असताना मोहन सदाशिव सूर्यवंशी हा दुचाकीवरुन गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या ताब्यातून गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत एक दुचाकी व गुटखा असा ४९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तसेच गंगाखेड शहरातील दत्त मंदिर परिसरात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई केली आहे. सचिन मदन पळसे असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ८ हजार ५७०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.