ग्रापमंचायत निवडणुकीत बहिष्कारास्त्र पडले अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:14+5:302021-01-08T04:52:14+5:30
सोनपेठ तालुक्यातील लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंप्री, लोहीग्राम, गोळेगाव या सात ग्रामपंचायतींनी रस्त्याच्या प्रश्नांवर विधानसभा निवडणुकीवर ...
सोनपेठ तालुक्यातील लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंप्री, लोहीग्राम, गोळेगाव या सात ग्रामपंचायतींनी रस्त्याच्या प्रश्नांवर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे या गावांमध्ये मतदानाला प्रतिसाद मिळाला नाही. आता या सातही गावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. यावेळी मात्र येथील ग्रामस्थांनी बहिष्कारास्त्र म्यान केले आहे. आता या गावांत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावानेही विधानसभा निवडणुकीत रस्त्याच्या कामासाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. या गावातही आता ग्रामपंचायतीची निवडणूक जोरदारपणे सुरू आहे. विशेष म्हणजे, सोनपेठमधील ७ व पाथरीतील १ अशा आठही गावांमधील रस्त्यांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.
लोकसभेला टाकलेला बहिष्कार राजा ग्रामस्थांच्या पथ्थ्यावर
सेलू तालुक्यातील सेलू-वालूर रस्त्यावरील ब्राह्मणगाव जवळ असलेल्या राजा या गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर या गावाला जोडणाऱ्या संबंधित रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या गावात सध्या ग्रा. पं. ची निवडणूक प्रभावीपणे लढविली जात आहे.
रस्त्यांच्या प्रश्नांवरच बहिष्काराचा निर्णय
सोनपेठ तालुक्यातील ७, पाथरी तालुक्यातील १ आणि सेलू तालुक्यातील १ अशा एकूण ९ गावांनी रस्त्यांच्या मागणीसाठीच विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. सेलू तालुक्यातील राजा गाव वगळता इतर आठ गावांना हे बहिष्कारास्त्र कामी आले नाही.
विटा ते शर्शी या गोदाकाठी असलेल्या १७ कि.मी. रस्त्याचे काम करण्यात यावे, या मागणीसाठी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता; परंतु, याकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे यावेळेस ग्रामंपचायत निवडणुकीत मतदान करून प्रश्नांची सोडवणूक करणार आहोत.
-सोमनाथ नागुरे, वाडी पिंपळगाव, ता. सोनपेठ
पाथरी तालुक्यातील डोंगरगावला जोडणाऱ्या ५ कि.मी. रस्त्याच्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला होता. त्यानंतरही रस्त्याचे काम झाले नाही; परंतु, आता सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ग्रा. पं. निवडणुकीत सहभागी झालाे आहोत.
-नारायण फासाटे, डोंगरगाव, ता. पाथरी-नारायण फासाटे, डोंगरगाव, ता. पाथरी