'आमचा मतदानावर बहिष्कार'; आंदोलक ग्रामस्थांनी 'इव्हिएम' जागृती करणाऱ्या पथकाला पिटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 04:52 PM2019-09-18T16:52:36+5:302019-09-18T17:40:25+5:30
ग्रामस्थ ३१ ऑगस्टपासून धरणे आंदोलन करत आहेत
मानवत (परभणी ) : तालुक्यातील खडकवाडीसह सावळी जंगमवाडी, नागरजवळा येथे ग्रामस्थांचे कर्जमाफीसाठी पात्र असताना डावलण्यात आल्याच्या आरोप करत धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाचा फटका मतदान जनजागृती करणाऱ्या महसूलच्या पथकाला बसला. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी, 'आमचा मतदानावर बहिष्कार आहे, तुम्ही इथून निघा' असा आक्रमक पवित्रा घेत पथकाला पिटाळून लावले.
तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकऱ्यांनी गावातील हनुमान मंदीरात ३१ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. राज्य शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज आहे. अशा शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ होणे अपेक्षीत असताना बॅक प्रशासनाच्या वतीने विशिष्ट रक्कम भरण्यासाठी सांगितले जात असल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. खडकवाडी येथील आंदोलकांची लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेतली मात्र यात तोडगा निघाला नाही. यामुळे आंदोलन सुरूच आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तहसील कार्यालयाच एक पथक दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावात आले. पथकाने हनुमान मंदिरासमोर इव्हीएम मशीन एका टेबलवर मांडून गावकऱ्यांना बोलवले. मात्र, धरणे आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हे प्रात्यक्षिक बंद पाडले.'आगामी विधानसभा निवडणूकीवर आमचा बहिष्कार आहे, यामुळे तुम्ही निघा' असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पथकाने काढता पाय घेतला.