नियम डावलत शासकीय कर्मचाऱ्यांकडून ड्रेस कोडला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:29+5:302021-01-08T04:52:29+5:30
परभणी : शासनाने ठरवून दिलेला ड्रेस कोड न वापरता रंगीबेरंगी कपडे परिधान करून शासकीय कार्यालयात कामकाजावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ...
परभणी : शासनाने ठरवून दिलेला ड्रेस कोड न वापरता रंगीबेरंगी कपडे परिधान करून शासकीय कार्यालयात कामकाजावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नसल्याने ड्रेस कोडची संकल्पना गुंडाळली जात आहे.
शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडवरून सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्याची ओळख पटावी, या उद्देशाने वर्ग ४ कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे.
यासंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारच्या सुमारास पाहणी केली असता सेवक वगळता इतर कर्मचारी विविध रंगांच्या ड्रेसमध्ये कर्तव्यावर हजर होते. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास महानगरपालिका कार्यालयातही ड्रेस कोड वापरला नसल्याचे पाहावयास मिळाले, तर जि.प. कार्यालयातही अशीच स्थिती दिसून आली.
सेवक ड्रेस कोडमध्ये हजर
जिल्हाधिकारी कार्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी ड्रेस कोडमध्ये उपस्थित नव्हते. सेवक मात्र पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट या ड्रेसमध्ये उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले. काही सेवकांनीही ड्रेस कोड वापरला नसल्याचे गुरुवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.
नियम पाळण्यात उदासीनता
महानगरपालिकेच्या कार्यालयात पाहणी केली असता, ड्रेस कोडचे नियम पाळण्यास कर्मचारी उदासीन असल्याचे दिसून आले. कोणीही या नियमांचे पालन करीत नाही. केवळ आयुक्तांच्या कक्षाजवळील सेवक ड्रेस कोडमध्ये उपस्थित होता.
नियमांचे गांभीर्य नाही
जिल्हा परिषद कार्यालयात पाहणी केली असता, सेवक वगळता तृतीय श्रेणीतील एकाही कर्मचाऱ्याने ड्रेस कोड वापरला नसल्याचे दिसून आले. वेगवेगळ्या रंगांच्या ड्रेसमुळे जि.प. कार्यालयात नियमांचे गांभीर्य नसल्याचेच दिसून आले.