लाचखोरांनो दिव्यांगांना तरी सोडा; अपंगत्व प्रमाणपत्र काढून देण्यासाठी घेतली लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 05:07 PM2023-06-16T17:07:21+5:302023-06-16T17:07:57+5:30
ही सापळा कारवाई होण्यापूर्वी तक्रारदार यांच्याकडून आरोपीने तीन हजारांची रक्कम फोन पेद्वारे घेतली होती.
परभणी : अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालयातून काढून देण्याकरिता एका खासगी इसमाने तक्रारदाराकडे सात हजारांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी लावलेल्या सापळ्यामध्ये या खासगी इसमाने दोन हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीस पथकाने ताब्यात घेतले.
विष्णू बापूराव कोरडे (३२, व्यवसाय : खासगी नोकरी, रा.ठाकरे नगर, परभणी) असे आरोपीचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीकडे तक्रारदाराने मंगळवारी तक्रार दिली होती. तक्रारदार यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढावयाचे होते. यातील तक्रारदार यांना विष्णू कोरडे याने त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांसोबत ओळख आहे, असे सांगितले. अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढून देण्याकरिता विष्णू कोरडे याने तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी तीन हजार रुपये घेतले होते. याबाबत बुधवारी विभागाने केलेल्या सापळा पडताळणीत पंचांसमक्ष विष्णू कोरडे याने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणात अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अजून पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे, मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, मो.जिब्राहिम, घुले, कदम यांच्या पथकाने केली.
फोन पेवर यापूर्वी घेतली होती रक्कम
ही सापळा कारवाई होण्यापूर्वी तक्रारदार यांच्याकडून आरोपीने तीन हजारांची रक्कम फोन पेद्वारे घेतली होती. अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पडताळणी दरम्यान दोन हजार रुपयांची रक्कम आरोपीने मागितली आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पाच हजार रुपये द्यावे लागतील, असेही तक्रारदारास सांगितले होते. त्यावरून सापळा कारवाई केली असता त्यात दोन हजारांची लाच आरोपीने पंचासमक्ष स्वीकारली.