साडेचार लाखाची लाच प्रकरण : स्वाती सूर्यवंशी यांच्यासह तिघांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:43 PM2020-09-11T17:43:09+5:302020-09-11T17:48:42+5:30
गंगाखेड येथील विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ४ लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण
परभणी : विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी साडेचार लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह तिघांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून त्यांना परभणी येथील न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
गंगाखेड येथील विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ४ लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, नगरविकास विभागातील अव्वल कारकून श्रीकांत करभाजने आणि गंगाखेड नगरपालिकेतील स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खय्यूम या तिघांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात ८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना न्यायालयाने ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
शुक्रवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच त्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या तिन्ही आरोपींचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. तिन्ही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.