विहिरीचे कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी स्वीकारली लाच; पंचायत समितीचा अधिकारी अटकेत
By राजन मगरुळकर | Published: March 11, 2023 11:34 AM2023-03-11T11:34:15+5:302023-03-11T11:35:08+5:30
पंचायत समितीच्या सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याविरुद्ध एसीबीचा सापळा
परभणी : तक्रारदाराच्या भावाच्या नावे मंजूर असलेल्या सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी पंचायत समितीच्या कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याने सात हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने परभणीतील पंचायत समिती कार्यालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
राहुल अंगदराव राख असे लाच स्वीकारलेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी ( कंत्राटी ) आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. पंचायत समिती परभणी येथे कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून राहुल राख कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या भावाच्या नावे मंजूर असलेल्या सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी राहुल राख यांनी सात हजारांची लाच मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून लाच मागणी पडताळणी व सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष पंचायत समिती कार्यालय परिसरात शुक्रवारी सायंकाळी राहुल राख यांनीही सात हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली. यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, बसवेश्वर जकीकोरे, चंद्रशेखर निलपत्रेवार, मिलिंद हनुमंते, अतुल कदम, शेख मुख्तार, शेख झिब्राहील, जनार्दन कदम यांनी केली. पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे तपास करीत आहेत.