पुलाचे काम अर्धवट; वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:46+5:302021-07-03T04:12:46+5:30
गंगाखेड शहर व परिसरातील नागरिकांना पालम रेल्वे गेटच्या हद्दीतून ये - जा करण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ...
गंगाखेड शहर व परिसरातील नागरिकांना पालम रेल्वे गेटच्या हद्दीतून ये - जा करण्यास अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन उड्डाण पूल उभारणीच्या कामास मंजुरी मिळाली. रेल्वे हद्दीतील उड्डाण पुलाचे काम २०१२ मध्येच पूर्ण करण्यात आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील उड्डाण पुलाच्या कामास चार वर्षांनंतर म्हणजेच २०१६ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. मात्र २०२१ चा जुलै महिना उजाडला असतानाही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे या पुलाचे काम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराच्यावतीने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वळण रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे चार - चार तास या वाहतूक कोंडीमध्ये वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे पुलाचे काम तातडीने होणे आवश्यक होते. मात्र संबंधित कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पाच वर्षांनंतरही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दररोजची वाहतूक कोंडी व वळण रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेला कंटाळलेल्या वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसतानाही अर्धवट पुलाच्या कामावरूनच वाहने नेण्यास सुरुवात केली आहे. मागील महिनाभरापासून या पुलावरून वाहनांची वर्दळ दिसून येत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अर्धवट पुलाच्या कामामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम तातडीने करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी गंगाखेड शहर व परिसरातील नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे.
उड्डाण पुलाचे काम अर्धवट आहे. या उड्डाण पुलावरून वाहतुकीस सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही परवानगी दिलेली नाही.
- केदार सोनवणे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग