भावाने केली बहिणीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:44 AM2020-01-04T00:44:14+5:302020-01-04T00:44:39+5:30
आईच्या नावाने असलेल्या शेतात जावून वाड्याची साफसफाई करण्यास गेल्याच्या कारणावरुन भाऊ, भावजय व त्यांच्या मुलांनी बहिणीला मारहाण केल्याची घटना २ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्त मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): आईच्या नावाने असलेल्या शेतात जावून वाड्याची साफसफाई करण्यास गेल्याच्या कारणावरुन भाऊ, भावजय व त्यांच्या मुलांनी बहिणीला मारहाण केल्याची घटना २ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्त मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगाखेड शहरातील रहिवासी मीना रमाकांत मुरकुटे (४५) यांनी त्यांच्या आई कृष्णाबाई लक्ष्मण मुंडे यांच्या नावाने असलेली एक एकर ७ गुंठे जमीन व शेतातील जुना वाडा चार वर्षापूर्वी आईकडून विकत घेतला होता. २ जानेवारी रोजी मीना मुरकुटे व त्यांचा मुलगा शिवप्रसाद मुरकुटे हे शेतातील वाड्याची साफसफाई करण्यासाठी गेले असता सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शेतातील वाड्यात आलेल्या लहान भाऊ विजय लक्ष्मण मुंडे, भावजय कमलबाई विजय मुंडे, पुतन्या वैभव विजय मुंडे, विवेक विजय मुंडे, शहाजी बंडू मुंडे, अनिता शहाजी मुंडे, भावजय लक्ष्मीबाई बंडू मुंडे (रा.सर्व दत्तमंदिर परिसर, गंगाखेड) यांनी तू वाड्याची साफसफाई का करतेस, हा वाडा व शेत आमचे आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. तेव्हा हा वाडा व एक एकर जमीन मी आईकडून विकत घेतल्याचे सांगत, मी येथून जाणार नाही, असे म्हणताच मीना मुरकुटे यांना भाऊ विजय मुंडे यांचा मुलगा विवेक मुंडे याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर भावजय कमलबाई मुंडे, लक्ष्मीबाई मुंडे, अनिता मुंडे या तिघींनी मारहाण केली. मुलगा शिवप्रसाद मुरकुटे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद मीना मुरकुटे यांनी दिल्यावरुन शुक्रवारी पहाटे गंगाखेड पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार हे पुढील तपास करीत आहेत.