शेतकऱ्यांनच्या प्रश्नांवर बीआरएसने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मारली धडक
By मारोती जुंबडे | Published: August 22, 2023 04:57 PM2023-08-22T16:57:15+5:302023-08-22T16:57:43+5:30
शनिवार बाजार परिसरातून काढला मोर्चा
परभणी: तेलंगणा मॉडलवर आधारित तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर दिलेला अहवाल त्वरित लागू करावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये पेरणीपूर्व देण्यात यावेत, शेतीला २४ तास वीज नि:शुल्क द्यावी, उत्पादित झालेल्या शेतमालाची गाव पातळीवर खरेदी करून २४ तासात शेतकऱ्यांना पैसे देण्यात यावे, शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. त्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष माणिक कदम, भगवान सानप, सुधीर बिंदू, अमृतराव शिंदे, रमेश माने, जाफर तरोडेकर, पवन करवर, रंगनाथ चोपडे, भगवान शिंदे, बाळासाहेब आळणे, मंचक सोळंके, प्रकाश भोसले, प्रवीण फुके, अभिजीत पाटील, कुलदीप करपे, विनोद पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.