‘वोट फॉर नेशन’ जनजागृतीसाठी बूलेटस्वारी; सात दिवसात ४ हजार किलोमीटरचा राज्यात प्रवास
By राजन मगरुळकर | Published: January 13, 2024 06:42 PM2024-01-13T18:42:43+5:302024-01-13T18:42:55+5:30
अभियंत्याचा आजपर्यंत सामाजिक अभियान राबविण्यासाठी एक लाख ३० हजार किलोमीटरचा बुलेट प्रवास
परभणी : ‘वोट फॉर नेशन’ अभियानानिमित्त जनजागृती करण्यास परभणीतील शैलेश कुलकर्णी यांनी राज्यभरात बूलेटस्वारी केली. यात त्यांनी अवघ्या सात दिवसात चार हजार २५२ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. तसेच विविध ठिकाणी भेटी देत संपर्क साधून नवयूवक मतदारांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती केली. याच त्यांच्या कार्याची, विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉडसने घेतली आहे. नुकतेच त्यांना याचे मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले.
शैलेश शेषराव कुलकर्णी हे अभियंता असून ते परभणीचे रहिवाशी आहेत. त्यांचे वडिल हे पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा लॉयन्स प्रिन्स क्लब यांच्या सहकार्याने शैलेश यांनी ही मोहिम राबविली. अभियानांतर्गत १८ वर्षापुढील मुलांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून येणाऱ्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजवावा यासाठी केलेल्या मोहिमेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. भारत सरकारद्वारे ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानासाठी २३ हजार किलोमीटर, ३४ राज्यांची संपूर्ण भारत यात्रा बुलेटद्वारे करण्यासाठी एकमेव त्यांची मराठवाड्यातून निवड झाली होती. बूलेटस्वारी अभियानांतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांची यात्रा कुलकर्णी यांनी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी परभणीतून सुरु केली होती. ही वारी २२ नोव्हेंबर रोजी म्हणजे सात दिवसात संपवून हा विश्वविक्रम स्थापित केला. यासाठी शैलेश कुलकर्णी यांना आई, वडील एस.एम.कुलकर्णी, सासू-सासरे किशोर जोशी, पत्नी अपर्णा कुलकर्णी यांचे सहकार्य केले.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली दखल
फास्टेस्ट नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा यांच्याही विश्वविक्रमाची नोंद आहे. से नो टू सिंगल यूज प्लास्टिक या शासकीय अभियानाला राबविण्यासाठी त्यांनी नेपाळ, भूटान अशा दोन देशांची बुलेट राईड केली. भारतीय सेना सन्मान यात्रा अभियान काश्मिर ते कन्याकुमारी तसेच लोंगेवाला पाकिस्तान बॉर्डर व रन ऑफ कच येथे पाकिस्तान बॉर्डर पर्यंतचा प्रवास त्यांनी एकट्याने बुलेटवर केला. आजपर्यंत एक लाख ३० हजार किलोमीटरचा एकूण प्रवास सामाजिक अभियान राबविण्यासाठी त्यांनी बुलेटवरुन केला आहे.