बनवसच्या घरफोडीतील चोरटा निघाला परभणीतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:10+5:302021-07-20T04:14:10+5:30
परभणी : पालम तालुक्यातील बनवस येथे घरफोडी करणारा चोरटा परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात पाल ठोकून राहत असल्याची ...
परभणी : पालम तालुक्यातील बनवस येथे घरफोडी करणारा चोरटा परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात पाल ठोकून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी १७ जुलैला त्यास अटक केली. या आरोपीकडून विविध गुन्ह्यांतील ६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
बनवस येथील गोविंद रामराव सुरनर यांच्या घरी १२ जुलैला रात्री चोरी झाली होती. या प्रकरणाचा तपास येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सुरू केला. शहरातील वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर पाल ठोकून राहणाऱ्या व्यक्तींवर संशय निर्माण झाला. त्यामुळे १७ जुलैला सकाळी पाळत ठेवून पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी रात्रभर पालावर न राहता सकाळी-सकाळी पालावर पोहोचलेल्या एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरेश ऊर्फ गुप्ता शंकर शिंदे (रा.करमतांडा, सोनपेठ, ह.मु. टोकवाडी, ता.परळी) असे नाव आरोपीने सांगितले. त्याने बनवससह इतर ठिकाणी चोरलेले ११ तोळे सोने आणि रोख १ लाख ४१ हजार ५०० रुपये असा ६ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. इतर पाच साथीदारांच्या साह्याने घरफोड्या केल्याचे त्याने कबूल केले. या चोरट्यास अटक केल्याने पालम, पूर्णा आणि गंगाखेड येथे झालेल्या ४ घरफोड्यांची प्रकरणे उघडकीस आली आहेत. आरोपी सुरेश ऊर्फ गुप्ता शंकर शिंदे यास पालम पोलीस ठाण्यात हजर करून अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
डॉक्टराची वेशभूषा करून लावला सापळा
शहरातील वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर पाल ठोकून राहणाऱ्या काही जणांचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांना संशय आला होता. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी रात्रभर या पालावर नजर ठेवली. मात्र, रात्री संशयित पालावर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार व सानप व बामणवाड या पोलीस अधिकाऱ्यांनी १७ जुलैला सकाळी डॉक्टरांची वेषभूषा करुन पालावर सापळा लावला. संशयित चोरटा पालावर येताच चारही बाजूने घेरून त्यास पकडण्यात आले.