समोरच्या चाकांमधील स्प्रिंग तुटल्याने बस उलटली; चालक-वाहकांसह प्रवासी बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:40 AM2020-03-16T11:40:56+5:302020-03-16T11:48:03+5:30
पाठीमागून येणारा दुचाकीस्वार अपघातापासून वाचण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला आहे
सेलू : तालुक्यातील खवणे पिंप्री कडून सेलू कडे येत असलेली एसटीला राधे धामणगाव जवळ अपघात होऊन सहा प्रवाशी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला. बसच्या समोरील चाकांमधील स्ट्रिंग तुटल्याने हा अपघात झाला असून चालक-वाहकांसह प्रवासी बालंबाल बचावले असल्याची माहिती आहे.
सेलू बस स्थानकावरून सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे खवणे पिंप्री फेरी करण्यासाठी बस सोडण्यात आली.खवणे पिंप्री येथे सहा प्रवासी घेऊन बस ( क्रमांक एम एच ०६- ८७९० ) राधे धामणगाव जवळ येताच समोरच्या दोन चाकांना नियंञीत ठेवणारी स्प्रिंग अचानक तुटली. त्यामुळे वेगात असलेल्या बसच्या स्टेरिंगवरील चालकाचा ताबा सुटला. बस रस्त्याच्या डाव्या बाजूच्या लगतच्या शेतात जाऊन उलटली. यात बसमधील प्रवासी, चालक व वाहक बालंबाल वाचले आहेत. मात्र, सहा प्रवाशांना मुका मार लागला असल्याची माहिती आहे.
दरम्यान, बसला पाठी मागून ओव्हरटेक करणा-या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. माञ, या प्रयत्नात दुचाकीस्वार दताञय लक्ष्मण शिंदे ( ५०, रा खवणे पिंप्री) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक जसपालसिंग तसेच एसटी चे अधिकारी पोहचले आहेत.