अरुंद पुलावर बसचे पाटे तुटले; बसचालकाने प्रसंगावधान राखून ५७ प्रवाशांचा जीव वाचवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:37 PM2019-09-21T13:37:40+5:302019-09-21T13:42:05+5:30
येलदरी येथील अरुंद पुलावरील घटना
येलदरी (जि. परभणी) : औरंगाबादहून जिंतूर-येलदरीमार्गे रिसोडकडे जाणाऱ्या बसचे जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील अरुंद पुलावर अचानक पाटे तुटले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली घसरत असताना बसचालकाने प्रसंगावधान दाखवीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ब्रेक लावल्यामुळे ५७ प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही आगारामध्ये मोठ्या प्रमाणात नादुरुस्त बस आहेत. असे असतानाही नादुरुस्त बस लांबपल्यासाठी पाठविल्या जात आहेत. त्याचाच प्रत्यय १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास येलदरी येथील अरूंद पुलावर आला. येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाच्या धरणावर अरुंद पूल आहे. या पुलावरून औरंगाबादहून जिंंतूर -येलदरीमार्गे रिसोडकडे जाणारी एम.एच. ०६ एस.८९०८ क्रमांकाची बस सायंकाळी ६.३० सुमारास जात असताना अचानक बसचे पाटे तुटले. त्यामुळे ही बस चक्क पुलाकडे घसरत येत असतानाच बसचे चालक विजय पदमाने यांनी प्रसंगावधान राखत घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ब्रेक लावले. त्यामुळे ही बस पुलाच्या खाली पडतापडता वाचली. त्यामुळे ५७ प्रवाशांचे जीव वाचले. या बसमध्ये रिसोड, सेनगाव, हिंगोली, वाशिम आदी ठिकाणचे प्रवासी होते. आपला जीव वाचल्याने प्रवाशांनी बसचालकाचे आभार मानले.
एका महिन्यातील दुसरी घटना
६ सप्टेंबर रोजी जिंतूर-रिसोड या बसला याच ठिकाणी अपघात झाला होता. त्यावेळी ६२ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालक मधुकर घुगे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांंचे जीव वाचले होते. त्यातच आता १९ सप्टेंबर रोजी येलदरी येथील याच अरुंद पुलावरून वळण घेताना बसचे पाटे तुटल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.