प्रवाशांनी गजबजलेली बसस्थानके ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:28+5:302021-03-23T04:18:28+5:30

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपासून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील बसस्थानके ओस पडली असून, एसटीच्या दररोजच्या ...

Bus stops crowded with passengers | प्रवाशांनी गजबजलेली बसस्थानके ओस

प्रवाशांनी गजबजलेली बसस्थानके ओस

Next

परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपासून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील बसस्थानके ओस पडली असून, एसटीच्या दररोजच्या १ हजार २८८ फेऱ्या ठप्प झाल्या आहेत.

मागील वर्षी लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची सेवा तब्बल ६ महिने बंद करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात या सेवेला प्रारंभ झाला; परंतु आता पुन्हा कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. त्यामुळे आतापर्यंत प्रवाशांनी गजबजलेली बसस्थानके ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. एस.टी. महामंडळासह खाजगी प्रवासी वाहतूकही बंद असल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवासी वाहतूक बंद असली तरी रेल्वेची सेवा सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी ऐनवेळी रेल्वे आरक्षण करून जिल्ह्याबाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकावर आरक्षण तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढली होती.

सोमवारी सकाळपासून एसटी महामंडळाची एकही बस जिल्ह्यात धावली नाही. तसेच जिल्ह्या बाहेरूनही इतर आगाराच्या बसला जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे बसस्थानक परिसर ओस पडल्याचे पाहावयास मिळाले.

एस.टी. महामंडळाच्या परभणी विभागांतर्गत परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. परभणी विभागातून दररोज २१४ बस सेवांचे नियोजन केले जाते. या बसगाड्यांच्या १ हजार २८८ फेऱ्या होतात. दररोज ७४ हजार ११४ किलोमीटर धावणारी परभणी विभागातील बससेवा सोमवारपासून मात्र ठप्प झाली आहे.

१७ लाखांचे उत्पन्न बुडाले

एस. टी. महामंडळाच्या परभणी विभागातून होणाऱ्या बस फेऱ्यांच्या माध्यमातून विभागाला दररोज सरासरी १७ लाख १० हजार ५५१ रुपयांचे उत्पन्न मिळते. सोमवारी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आल्याने हे उत्पन्न बुडाले आहे. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या बससेवेच्या माध्यमातून दररोज २ लाख ४३ हजार ४९४ रुपयांचे उत्पन्न महामंडळाच्या परभणी विभागाला प्राप्त होते. हे उत्पन्नही कोरोनामुळे ठप्प झाले आहे.

हॉटेल्स, चहा स्टॉल बंद

सोमवारी जिल्ह्यातील हॉटेल्स आणि चहा स्टॉलही बंद ठेवण्यात आले. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी असते. ही गर्दी कमी करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल्स, चहा स्टॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे शहरात हॉटेल आणि चहा स्टॉलच्या परिसरातील गर्दी ओसरली होती. काही विक्रेत्यांनी पार्सल सेवा सुरू केली असून ग्राहकांपर्यंत जाऊन चहा व खाद्य पदार्थ पुरविले जात आहेत.

Web Title: Bus stops crowded with passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.