परभणीत बाजारपेठ बंद ठेवून व्यापा-यांचा मनपावर मोर्चा; दुकानांचे सील तत्काळ काढण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:31 PM2017-12-15T17:31:26+5:302017-12-15T17:33:08+5:30
व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
परभणी : व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ७ व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकले आहे. मनपाच्या या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी दुकाने बंद ठेवून दुपारी मनपावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास शिवाजी चौकातून सुरुवात झाली. गांधी पार्क येथे आल्यानंतर व्यापा-यांनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्याविरुद्ध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर नारायण चाळ परिसरात हा मोर्चा आल्यानंतर आयुक्त रेखावार यांच्याविरुद्ध रोष व्यक्त करत आयुक्तांनी न्यायालयाच्या निकालाचा अपमान केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी केला. त्यानंतर विसावा चौकात हा मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्या व्यापा-यांनी मोठे रिंगण करुन आयुक्तांची बदली करावी, व्यापा-यांकडून जाचक पद्धतीने एलबीटीची थाकबाकी वसूल करणे थांबवावी. तसेच ज्या व्यापा-यांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे, ते सील तत्काळ काढण्यात यावे, आदी मागण्यांसह घोषणा देत मनपा आयुक्त रेखावार यांचा निषेध केला.
मोर्चा मनपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर पोलिसांनी या मोर्चाला तेथेच अडविले. तेव्हा व्यापारी व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर व्यापा-यांनी राष्ट्रीय महामार्गावर आपले बस्तान मांडून मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत दुकानांना ठोकलेले सील काढावे अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, असा सवाल केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके, संजय मंत्री, सचिन अंबिलवादे, नितीन वट्टमवार, नंदकिशोर अग्रवाल सायकलवाले,अशोक माटरा, दिलीप खैराजानी, सुनील अग्रवाल, सतीश नारवानी, नंदकिशोर अग्रवाल, मनोज माटरा यांच्यासह २०० ते ३०० व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
आयुक्तांशी तीन तास झाली चर्चा
व्यापारी आणि पोलिसांमध्ये केवळ व्यापा-यांचे पाच प्रतिनिधी मनपात सोडण्याचा तोडगा काढण्यात आला. व्यापा-यांचे पाच प्रतिनिधींनी मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्या कक्षामध्ये जावून त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. मात्र या चर्चेमध्ये कोणताही पर्याय निघाला नाही. त्यामुळे व्यापा-यांनी पुन्हा शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु केले.