तरुणीची छेड काढून दुसऱ्या गावात लपला; पोलिसांनी पाठलाग करून तरुणाला ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 02:36 PM2024-12-09T14:36:18+5:302024-12-09T14:37:54+5:30
आरोपीस पोलिसांनी २४ तासांत पकडले; माहिती मिळताच विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकांची पोलिस ठाण्यात गर्दी
परभणी: महाविद्यालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात पायी जात असताना आरोपीने संबंधित तरुणीची छेड काढल्याचा प्रकार ६ डिसेंबरला घडली. याप्रकरणी आरोपीवर फिर्यादीने शनिवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून रविवारी रात्री उशिराने आरोपीचा पाठलाग करत त्यास २४ तासात ताब्यात घेतले.
परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालय परिसरातील रस्त्याने मैत्रिणीसोबत सरकारी दवाखान्याकडे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे फिर्यादी तरुणी पायी जात होती. त्यावेळी तिच्या पाठीमागील बाजूने एका दुचाकी चालकांनी फिर्यादीच्या समोर येऊन फिर्यादीस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. त्यानंतर दुचाकी चालक तेथून पळून गेला. या प्रकरणात फिर्यादी युवतीने नानलपेठ पोलीस ठाणे गाठून दिलेल्या माहितीवरून शनिवारी विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद होताच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ही तातडीने पावले उचलली.
आरोपी हा परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे असल्याचे समजतात पोलीस धर्मापुरीकडे रवाना झाले. मात्र पोलीस येत आहेत, याची कुणकुण लागताच आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत मोहम्मद असलम मोहम्मद सलीम (रा. वांगी रोड, परभणी) या आरोपीला पकडले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश कांबळे, शौएब पठाण, भगवान सोडगीर, अंबादास चव्हाण, संतोष सानप यांच्या पथकाने केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे करीत आहेत.
२४ तासांत लावला शोध
शनिवारी या प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्याच्या वतीने दोन पथके तयार केली होती. पोलीस यंत्रणेकडून आरोपी बाबत कोणताही क्लू नसताना अवघ्या २४ तासात या आरोपीचा शोध लावण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. त्यात केवळ दुचाकीचा क्रमांक होता मात्र संबंधित आरोपी कुठे राहतो किंवा काय करतो याविषयी माहिती नसताना गुप्त माहिती काढून यंत्रणेने आरोपीला ताब्यात घेतले.
परभणीकरांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
जिल्हा पोलीस दलाने अवघ्या एक दिवसात केलेल्या या कामगिरीमुळे परभणीतील नागरिक, विविध सामाजिक संघटना, याशिवाय पदाधिकारी यांनी समाज माध्यमावर असो की स्थानिक पातळीवर पोलिसांचे वैयक्तिक कौतुक केले.
आरोपीला दुपारी न्यायालयात हजर करणार
सदरील घटनेतील आरोपीला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात रविवारी दोन पथके विविध ठिकाणी पाठविली होती. स्थानिक गुन्हा शाखा दोन पथके, सायबर विभागाचे एक पथक, नानलपेठचे एक पथक यासाठी ऍक्टिव्ह होते. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकांची गर्दी
आरोपीला ताब्यात घेतले याची माहिती झाल्यानंतर संबंधित प्रकरणातील महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी याशिवाय पालक शिक्षक प्राध्यापक यांनी सुद्धा नाणेलपेठ पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संबंधित सर्वांना मार्गदर्शन करून शांतता राखण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सर्व पथकांचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे या कामगिरीबद्दल कौतुक केले.