कलेक्टर मॅडमचा पीए सांगून व्यापाऱ्याला गंडा; तीन पथके आरोपीच्या शोधात रवाना
By राजन मगरुळकर | Published: April 28, 2023 04:25 PM2023-04-28T16:25:58+5:302023-04-28T16:27:00+5:30
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत
परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानेच एका व्यापाऱ्याची फसवणूक करून त्याला रोख दोन लाख दहा हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपीच्या शोधासाठी आता परभणी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. त्यामुळे आरोपीची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
व्यापारी कैलास टिकमदास तुळसाणी यांनी गुरुवारी सायंकाळी फिर्याद नोंदविली. तुळसाणी यांनी आरोपी सुरेश वाघमारे नावाचा इसम याच्याविरुद्ध विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शोधासाठी तीन पथके रवाना केली. ज्यामध्ये दोन पथके स्थानिक गुन्हा शाखेची तर एक पथक नानलपेठ ठाण्याचे तपासासाठी रवाना झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
भामट्याने मागितले होते तीन लाख दहा हजार
फिर्यादी तुळसाणी यांच्या दुकानावर आरोपी सुरेश वाघमारे हा गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास पोहोचला. त्याने कलेक्टर मॅडम यांना ईदनिमित्त ड्रेसचे वाटप करायचे आहे, यासाठी चांगले ड्रेस दाखवा, असे म्हणून व्यापाऱ्याशी संवाद साधला. त्यावर व्यापाऱ्याने तीन सॅम्पल ड्रेस काढले आणि सोबत दुकानातील एक कामगार संबंधितासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला. मुलाला सोबत घेऊन सदरील इसम जिल्हाधिकारी कार्यालयात आला. तेथे तो वेटिंग हॉलमध्ये बसला. काही वेळ दुकानातील मुलाला तेथे बसविले. यानंतर त्यातील ड्रेस घेऊन त्याने परिसरात फेरफटका मारून हे ड्रेस निश्चित झाले असून असे ४६ ड्रेस अजून काढा, असा निरोप संबंधित कामगार व व्यापाऱ्याला दिला व त्याचे बिल ९० हजार झाले असेल तर तुम्ही येताना सोबत तीन लाख दहा हजार घेऊन या. कारण जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा आहेत, त्याचे दोन बंडल असून त्या नोटा तुम्हाला दिल्या जातील, तुम्ही तुमच्याकडील पाचशेच्या नोटा असलेले तीन लाख दहा हजार रुपये घेऊन या, असे म्हणून भामट्याने व्यापाऱ्याला गळ घातला आणि पुढील फसवणुकीचा प्रकार घडला.
अरे जागेवरून उठा, मॅडम आल्या
सदरील प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी ज्यावेळेस घडला, त्यावेळेस जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या दुपारी कार्यालयात दाखल झाल्या. हीच बाब हेरून सदरील भामट्याने परिसरातील अभ्यांगत, नागरिक तसेच इतरांना जागेवरुन उठा, जिल्हाधिकारी मॅडम आल्या आहेत, असे म्हणून आपली ओळख असल्याचे व्यापारी, इतरांना भासविले. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीला परिसरातील पीए यांच्या केबिनमध्ये बसवून सदरील आरोपी हा तुम्ही दिलेले पैसे मी मशीनवर मोजून येतो, तोपर्यंत इथेच थांबा, असे म्हणून तेथून बाहेर निघाला आणि यानंतर त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून काढता पाय घेत पोबारा केला, असा हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
ड्रेस अन् राहणीमानाने तयार केली बनवाबनवी
आरोपी नामे सुरेश वाघमारे यांनी परिधान केलेला ब्लेझर ड्रेस, हातातील घड्याळ, सूटबुटाचा पेहराव व्हीव्हीआयपी असल्यासारखा भासवून आपली सर्वांसोबत ओळख आहे, असा प्रकार सर्वांच्या समक्ष दाखवून देत त्याने बनाव रचत फसवणुक केल्याने कोणाला शंकाही आली नाही.