चोरी रोखण्यासाठी केबलने वीज पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:08+5:302020-12-05T04:27:08+5:30
ग्रामीण भागात वीज ग्राहक कमी व आकडे बहाद्दरांची संख्या जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात रोहित्र जळून खाक होत आहेत. नियमित ...
ग्रामीण भागात वीज ग्राहक कमी व आकडे बहाद्दरांची संख्या जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात रोहित्र जळून खाक होत आहेत. नियमित वीज वापर करणाऱ्यांना अंधारात राहण्याची वेळ येते. त्यामुळे ग्रामीण भागात वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे वीज वितरण कंपनीने यावर पर्याय म्हणून तालुक्यातील ७ गावांत विद्युत ताराने होणारा वीज पुरवठा बंद करून केबल टाकून वीज पुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक खांबावर अधिकृत ग्राहकांना जोडणी देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आकडे टाकून वीज घेणे बंद झाले आहे. पर्याय नसल्याने नवीन जोडणाी घेणाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ होऊन ग्राहक वाढले आहेत. तालुक्यातील ७ गावांतील या प्रयोगाला यश आले असून, वीज चोरीला आळा बसून थकबाकी वसुली व नवीन ग्राहक संख्या वाढली आहे.
पालम तालुक्यात वीज वितरण कंपनीने टप्प्या टप्प्याने ७ गावांत केबलने वीज पुरवठा करण्याचा प्रयोग राबविला आहे. त्यामुळे या गावांत ग्राहकांना वेळेवर वीज पुरवठा होत असून, नेहमीच्या तक्रारी बंद झाल्या आहेत. थकबाकी वसूल होऊन नियमित ग्राहक वाढले आहेत. तसेच रोहित्र जळणे व तांत्रिक बिघाड होत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत केला जात आहे.
व्ही.डी. स्वामी, उपअभियंता,पालम