परभणी जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांची क्षमता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 07:10 PM2018-07-09T19:10:58+5:302018-07-09T19:11:15+5:30
- प्रसाद आर्वीकर
परभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यात येणारे धान्य साठविण्यासाठी असलेल्या शासकीय गोदामांची क्षमता वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन महिन्यांचा धान्य साठा करता येईल, अशा पद्धतीने जिल्ह्यात ९ नवीन गोदामांचे बांधकाम होणार आहे़ त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अंदाजपत्रके मागविली आहेत़
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील लाभधारकांना अल्पदरात धान्याचा पुरवठा केला जातो़ लाभार्थ्यांसाठी आलेले धान्य शासकीय गोदामांमध्ये साठविले जाते़ मात्र जिल्ह्यात गोदामांची साठवण क्षमता कमी असल्याने अनेक वेळा अडचणींना सामोरे जावे लागते़ परभणीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी किरायाने गोदाम घेऊन धान्याचा साठा केला जात आहे़ शासकीय धान्य गोदामांची अवस्था वाईट आहे़ या ठिकाणी मुबलक सुविधा उपलब्ध नाहीत़ तसेच साठवण क्षमता कमी असल्याने अडचणींचा सामना करावा लागतो़ या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी राज्य शासनाने शासकीय धान्य गोदामांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात ९ ठिकाणी नवीन गोदाम बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे़
जिल्ह्यात सध्या ११ शासकीय गोदामे आहेत़ या पैकी अनेक गोदामांची धान्य क्षमताही उपलब्ध धान्यापेक्षा कमी आहे़ अशा गोदामामध्ये दोन महिन्यांचे धान्य साठविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत़ धान्य पुरवठ्यानुसार १०८० मे़टन, १८०० मे़टन आणि ३००० मे़ टनाचे गोदाम बांधण्याचे निर्देश दिले आहेत़ ज्या ठिकाणी या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचे गोदाम आहेत़ तेथे नवीन गोदाम बांधाकम करावे लागणार आहे़ या तत्त्वानुसार परभणी शहरात ३००० आणि १०८० मे़ टन क्षमतेचे दोन गोदाम बांधावे लागणार आहेत़ तर पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, सेलू आणि जिंतूर या तालुक्यांच्या ठिकाणी १०८० मे़ टन क्षमतेचे नवीन गोदाम बांधकाम केले जाणार आहे़ या गोदामांच्या बांधकामांची प्रक्रिया सुरू झाली असून, १०८० मे़ टनाच्या गोदामासाठी साधारणत: दीड कोटी रुपये तर ३००० मे़ टनाच्या गोदामासाठी ३ कोटी रुपयांची आवश्यकता लागेल़ परभणी जिल्ह्यातील एकूण गोदामांची संख्या लक्षात घेता सर्वसाधारणपणे १५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे़ तत्पूर्वी गोदाम बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातून अंदाजपत्रके तयार केली जाणार आहेत़ हे अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांकडे मंजुरीसाठी पाठविले जातील़ सचिवांकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामांना सुरुवात होणार आहे़
जिल्ह्यातील गोदामांची सध्याची स्थिती
परभणी शहरामध्ये असलेल्या शासकीय गोदामांत प्रत्येक महिन्याला २०८३ मे़ टन धान्य साठा साठविला जातो़ प्रत्यक्षात शासकीय गोदामांची साठवण क्षमता १००० मे़ टन एवढीच आहे़ पूर्णा तालुक्यात ९१७ मे़ टन धान्य साठा असून, त्यासाठी १५८० मे़ टन क्षमतेचे गोदाम आहे़ पालम तालुक्यात ६१० मे़ टन धान्य येते़ परंतु, गोदामाची साठवण क्षमता केवळ २५० मे़ टन एवढी आहे़ गंगाखेड तालुक्यात ९८६ मे़ टन धान्य साठविले जाते़ गोदामाची क्षमता १५०० मे़ टन आहे़ सोनपेठ तालुक्यात ४६६ मे़ टन धान्यासाठी केवळ ५०० मे़ टन क्षमतेचे गोदाम आहे़ पाथरी तालुक्यात ६४१ मे़ टन धान्य येते़ गोदामाची साठवण क्षमता ७०० मे़ टन एवढी आहे़ सेलू तालुक्यात ८६९ मे़टन धान्य येते़ त्यासाठी ७०० मे़टन क्षमतेचे गोदाम आहेत़ मानवत तालुक्यात ५५१ मे़टन धान्य येते़ त्यासाठी १५०० मे़टन क्षमतेचे गोदाम आहे़ जिंतूर तालुक्यात १००० मे़ टन धान्य प्रतिमाह साठविले जाते़ त्यासाठी १५०० मे़ टनाचे गोदाम आहेत़ तर बोरी येथे ३५२ मे़ टन धान्यासाठी १००० मे़ टन साठवण क्षमतेचे गोदाम सध्या उपलब्ध आहे़
आठ दिवसांत अंदाजपत्रके द्या
नवीन गोदामांच्या बांधकामासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली़ या बैठकीत आठ दिवसांमध्ये अंदाजपत्रके सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना दिले आहेत़ या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते, जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे, लेखाधिकारी अरुण काटे, पुरवठा विभागातील अव्वल कारकून नानासाहेब भेंडेकर, लिपिक राजश्री बचाटे आदींची उपस्थिती होती़
तहसीलदार करणार जागा निश्चित
नवीन गोदाम बांधण्यासाठी प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार शासकीय जागा निश्चित करणार आहेत़ तहसीलदारांकडून जागा निश्चित केल्यानंतर गोदाम बांधकामाचा आराखडा बांधकाम विभागाकडून तयार केला जाणार आहे़
गोदामे होणार अद्ययावत
जिल्ह्यात ९ ठिकाणी अद्ययावत गोदाम उभारले जाणार आहेत़ त्यामध्ये संरक्षण भिंत, गोदामांच्या बाहेरील बाजुस विजेची व्यवस्था, हमालांसाठी चेंजिंग रुम, अंतर्गत रस्ते, गोदामपालांचे स्वतंत्र कार्यालय आदी बाबींचा समावेश राहणार आहे़
दोन महिन्यांचे धान्य साठवता येईल
राज्य शासनाने जिल्ह्यातील गोदामांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक गोदामात दोन महिन्यांचे धान्य साठवता येईल, अशा पद्धतीने गोदामांचे बांधकामे केली जाणार आहेत. परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला शासकीय गोदाम असून, तालुका वगळता बोरी येथेही गोदाम उपलब्ध आहे. बोरी आणि मानवत या दोन ठिकाणच्या गोदामात पूर्वीपासूनच दोन महिन्यांचा धान्य साठा होईल, एवढी क्षमता आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी नवीन गोदामांचे बांधकाम होणार नाही. उर्वरित नऊ ठिकाणी मात्र गोदाम बांधकाम प्रस्तावित करण्यात आले असून, त्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
नव्याने होणारी गोदामे
तालुका साठवण क्षमता
परभणी शहर ३००० मे़टन
परभणी ग्रामीण १०८० मे़टन
पूर्णा १०८० मे़टन
पालम १०८० मे़टन
गंगाखेड १०८० मे़टन
सोनपेठ १०८० मे़टन
पाथरी १०८० मे़टन
सेलू १०८० मे़टन
जिंतूर १०८० मे़टन