परभणीत प्रशासनाची बेफिकीरी अन् नागरिकांचा निष्काळजीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:30 AM2021-02-18T04:30:16+5:302021-02-18T04:30:16+5:30
परभणी : कोणत्याही नियमांचे पालन न करता होत असलेली थेट गर्दी, प्रशासनाची बेफिकीरी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे जिल्ह्यात पुन्हा ...
परभणी : कोणत्याही नियमांचे पालन न करता होत असलेली थेट गर्दी, प्रशासनाची बेफिकीरी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग डोके वर काढत आहे. मागील आठवड्यात ४९ वर असलेली रुग्ण संख्या आता थेट १२१ वर पोहोचली आहे. डिसेंबर महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. कोरोनाच्या तपासण्या वाढविल्यानंतरही रुग्णांचे प्रमाण मात्र कमी राहिले. त्यामुळे नागरिक चांगलेच निश्चिंत झाले. परिणामी मास्कचा वापर न करता जिल्हाभर वावरणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करता लग्न सोहळ्यांचा धडका जिल्ह्यात सुरू झाला. लग्न सोहळ्यात केवळ १०० नागरिकांच्या उपस्थिती बंधनकारक असताना मागच्या आठवड्यात ५०० ते ७०० वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पडले. याबाबत सोशल मीडियात ओरड होऊनही जिल्हा प्रशासनाने कसलीही कारवाई केली नाही. मनपानेही ना कारवाई केली ना नोटिसा दिल्या. त्यामुळे परिस्थिती अलबेल झाली आणि हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. दररोज १० ते १५ रुग्ण नोंद असताना मागच्या तीन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या २० पेक्षा अधिक गेली. मागच्या तीन दिवसांत ६८ नव्या रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.