गोदापात्रातील पोलीस कारवाईत १५ वाळूमाफियांवर गुन्हा दाखल; १ कोटी ५६ लाख रुपयांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:32 PM2021-04-09T16:32:54+5:302021-04-09T16:33:22+5:30
गंगाखेड तालुक्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी पात्रातील चार वाळू धक्के वगळता अन्य वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसतांना ही बहुतांश धक्क्यांवरून वाळूचे विनापरवाना अवैधरित्या उत्खनन करून वाहतुक केल्या जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
गंगाखेड: तालुक्यातील दुस्सलगाव व मुळी शिवारात गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळूउपस्या प्रकरणी दि. ६ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता गंगाखेड पोलीसांनी कारवाई केली. या प्रकरणी दि. ९ एप्रिल रोजी सकाळी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई वेळी पोलिसांनी तीन जेसीबी मशीनसह दोनशे ब्रास वाळू साठा असे एकूण एक कोटी ५६ लाख रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.
गंगाखेड तालुक्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी पात्रातील चार वाळू धक्के वगळता अन्य वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसतांना ही बहुतांश धक्क्यांवरून वाळूचे विनापरवाना अवैधरित्या उत्खनन करून वाहतुक केल्या जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी व पिंप्री या चार धक्क्यांचा लिलाव झालेला असतांना लिलावन झालेल्या खडका धरणाखालील धारासुर शिवारातील गोदावरी नदी पात्रापासून ते मसला दरम्यान तालुक्याच्या अंतिम टोकापर्यंत धारासुर, मैराळसावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, दुस्सलगाव, मुळी, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, पिंप्री, नागठाणा व मसला आदी गावालगतच्या पात्रातून राजरोसपणे अवैधरित्या वाळू उपसा केल्या जात आहे. महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावत आहे.
दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना तालुक्यातील दुस्सलगाव ते मुळी दरम्यान गोदावरी नदी पात्रातून मशीनद्वारे अवैधरित्या वाळु उपसा केल्या जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, जमादार रतन सावंत, पो. ना. दत्तराव पडोळे आदींनी मुळी शिवारातील नदी पात्रात छापा मारला. यावेळी चार ते पाच हायवा दुस्सलगाव शिवारातील नदी काठावरून पळून गेल्या. तर मुळी शिवारातील गोदावरी नदी पात्राजवळ एक मशीन उभ्या स्थितीत मिळून आले. तर नदी पात्रातून वाळु उपसा करणारे दुसरे मशीन चालकाने तात्काळ आणून या मशीनच्या बाजूला लावून पळ काढला. येथे केलेल्या पाहणीत मिळून आलेल्या अंदाजे दोनशे ब्रास वाळूचा ढिगारा व दोन पोकलेन मशीन आढळून आले.
यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव घरजाळे, पोलीस शिपाई प्रल्हाद वाघ यांना मुळी शिवारात थांबवून पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांचे पथक मुळी ते दुस्सलगाव दरम्यान गोदावरी नदी पात्रात बनविलेल्या मातीच्या कृत्रिम बांधावरून दुस्सलगाव शिवारातील नदी काठावर आले. येथे मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला उभे असलेले जेसीबी मशीन मिळून आले व नदी काठावरील टेकड्यावरील शेतात ही वाळूचे ढीग सापडले.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत ६ लाख रुपये किंमतीचा अंदाजे २०० ब्रास वाळूचा साठा, ८० लाख रुपये किंमतीची टू टेन जेसीबी मशीन, ६० लाख रुपये किंमतीची जेसीबी कंपनीची एल आर मशीन व १० लाख रुपये किंमतीची जेसीबी मशीन असा एकूण १ कोटी ५६ लाख रुपये किंमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी तीन मशीनचे चालकमालक संदीप वाळके, कालू भाई, अळनुरे वकील, राजू खान मोहम्मद खान, ओमकार शहाणे, मंजूर इलाही उर्फ राजू यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड करीत आहेत.