परभणी जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवर दरोड्याचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:57 PM2019-05-09T23:57:49+5:302019-05-09T23:58:20+5:30
किरकोळ वादातून मारहाण करुन दीड लाख रुपये लुटल्याच्या तक्रारीवरुन विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांचे पती अविनाश काळे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बाळू खंडागळे याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): किरकोळ वादातून मारहाण करुन दीड लाख रुपये लुटल्याच्या तक्रारीवरुन विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे यांचे पती अविनाश काळे यांच्यासह इतर चार जणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर अविनाश काळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बाळू खंडागळे याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला.
येसेगाव येथील अशोक महादेव गरड हे ६ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलने आडगावकडे जात असताना रसिका हॉटेल जवळ अविनाश काळे व इतर चौघांनी त्यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील दीड लाख रुपये काढून घेतले, अशी तक्रार अशोक गरड यांनी दिली आहे. त्यावरुन अविनाश काळे व इतरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंद झाला आहे. दुसऱ्या बाजुने अविनाश काळे यांनीही जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, ६ मे रोजी आडगावकडे जात असताना आरोपी बाळू खंडागळे यांनी गाडी आडवी लावून जबर मारहाण केली. यात सोन्याचे लॉकेट व रोख ९० हजार रुपये असा १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन खंडागळे याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.