सेवाभावी संस्थेत थाटला पत्त्याचा क्लब; ४४ जण पोलिसांच्या ताब्यात, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 05:30 PM2022-05-10T17:30:05+5:302022-05-10T17:31:01+5:30
सेलू शहरातील कृष्ण नगर भागात साई सेवाभावी संस्थानच्या खोल्यांमध्ये पत्त्याचा क्लब सुरू होता.
देवगावफाटा (परभणी) : सेलू शहरातील कृष्णनगर परिसरात साई सेवाभावी संस्थेच्या दोन बंद खोल्यात सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर ९ मे रोजी रात्री ७.१५ च्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली असून, त्यात ४४ जणांना ताब्यात घेतले आहे. रोख साडेतीन लाख रुपये, ५ चारचाकी, १२ दुचाकी असा सुमारे २५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.
सेलू शहरातील कृष्ण नगर भागात साई सेवाभावी संस्थानच्या खोल्यांमध्ये पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अश्वीनकुमार यांना मिळाली. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सोमवारी रात्री ७.१५ वाजता धाड टाकली. त्यावेळी दोन खोल्यांमध्ये रूममध्ये गोलाकार टेबलवर तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी रोख ३ लाख ४२ हजार रुपयांसह ४४ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर परिसरातील ५ चारचाकी वाहने,१२ दुचाकी वाहने जप्त केले आहेत.
ताब्यात घेतलेल्या ४४ आरोपींचे आधार कार्ड व इतर माहिती पोलिसांनी रात्रभरात मिळविली. त्यानंतर हा क्लब विनोद रामचंद्र पवार हे चालवित असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरुन पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरुन ४५ जणांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विनोद पवार यास पोलीसांनी मंगळवारी अटक केली.
परजिल्ह्यातीलही आरोपींचा समावेश
या कारवाईत पोलिसांनी ४४ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील आरोपींसह बीड, लोणार, किनवट, जालना, परतूर, मंठा, पुणे आदी ठिकाणच्या आरोपींचा समावेश आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्या ४४ जणांमध्ये शहरातील ४ व्यापारी ,१ लाकडी मिल चालक,१ ट्रान्सपोर्ट व्यावसायिक,१ सेवानिवृत्त, ८ मजूर, २ हमाल,१ सलून चालक, १ खाजगी वाहन चालक आणि १५ सधन शेतकऱ्यांचा समावेश आहे.
सर्वात मोठी कारवाई
सेलू शहरात पोलिसांनी केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. यापूर्वी तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी ८ जुलै २०२१ रोजी सातोना रोडवरील एका मनोरंजन केंद्रावर ३९ आरोपींविरुद्ध कारवाई केली होती. त्यावेळी ३ लाख ८८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.