परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:49 PM2017-12-12T18:49:52+5:302017-12-12T18:51:49+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतक-याचे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल केले. दाखल केलेल्या आॅनलाईन अर्जांचे जिल्ह्यामध्ये १ व २ आॅक्टोबर रोजी ६४४ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण करुन ५ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या आक्षेप अर्जावर तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीमध्ये कार्यवाही करण्यात आली.
तसेच जिल्ह्यातील पात्र शेतक-यांच्या कुटुंबासह प्रातिनिधीक सत्कार सोहळा १८ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला; परंतु, त्यानंतर शासनाने राज्यस्तरावरुन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांच्या नजरा ग्रीनलिस्टकडे होत्या. या कर्जमाफीवर तब्बल १ महिना कोणतीही कार्यवाही होत नसल्याने कर्जमाफी मिळते की नाही, या विचारात जिल्ह्यताील शेतकरी अडकला होता. त्यानंतर शासनाकडून मध्यवर्ती, व्यापारी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांना ८, २७, २८ नोव्हेंबर व ६ डिसेंबर रोजी पात्र लाभार्थी शेतक-यांच्या ग्रीनलिस्ट याद्या प्राप्त झाल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित १ लाख २७ हजार ५७ शेतक-यांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा करणे बाकी आहे.
प्रोत्साहनपर रक्कमेचा ३१ हजार शेतक-यांना फायदा
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २०१५-१६ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची ३० जून २०१६ पूर्णत: परतफेड केलेल्या शेतक-यांनी २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परतफेड केल्यास त्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार होती. यामध्ये जिल्ह्यातील ३१ हजार ८७८ शेतक-यांच्या बँक खात्यावर ४२ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे प्रोत्साहनपर रक्कमेचा आतापर्यंत ३१ हजार ८७८ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.