अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:31 AM2021-03-13T04:31:20+5:302021-03-13T04:31:20+5:30
सोनपेठ : तालुक्यातील पोहंडूळ शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर १० मार्च रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी पकडला. सोनपेठ तालुक्यातील ...
सोनपेठ : तालुक्यातील पोहंडूळ शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर १० मार्च रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांनी पकडला.
सोनपेठ तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बुधवारी दुपारी पोहंडूळ शिवारात गस्तीवर असताना त्यांना एमएच- २२ एएन- ५५५५ क्रमांकाचा हायवा टिप्पर आढळला. यावेळी त्यांनी वाहन थांबवून चालकाकडे विचारणा केली असता त्याने या टिप्परमध्ये वाळू असल्याचे सांगितले. यावेळी चालकाला कागदपत्रांची मागणी केली असता त्याने यासाठीची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हा हायवा टिप्पर जप्त करून पोलीस ठाण्यात आणला. याबाबत आरोपी शेख समीर इस्माईल हा ५ ब्रास अवैध वाळूची टिप्परमधून वाहतूक करताना आढळून आल्याने पोलीस कर्मचारी महेश कौठाळे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. प्रवीण सोमवंशी, पोलीस कर्मचारी महेश कौठाळे, चालक करवर आदींच्या पथकाने केली.
दरम्यान, आरोपी शेख समीर याला पोलिसांनी ११ मार्च रोजी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.