सीसीआयने खरेदी केला सव्वालाख क्विंटल कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:27+5:302020-12-09T04:13:27+5:30
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी ...
तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यामध्ये कापसाची २१ हजार ६३५ हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून कापूस वेचणीला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात वेचणी होऊन कापूस शेतकऱ्यांच्या घरात येऊन पडला आहे. सद्य:स्थितीत ४५०० ते ५१०० पर्यंत कापसाला भाव मिळत असून, हा भाव केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ५८०० पेक्षा ७०० ते ९०० रुपयांनी कमी असल्याने शेतकरी सद्य:स्थितीत हाती आलेला सर्व कापूस विक्री करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत खाजगी प्रेसिंग जिनिंग या व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी करायला सुरुवात केली होती; पण या ठिकाणीही कापसाची आवक होत नसल्याचे चित्र आहे. मागील दोन महिन्यांत केवळ २० हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. दुसरीकडे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याकडे असल्याचे शेतकरी सांगत होते. २० नोव्हेंबर रोजी सीसीआयने हमीदराने कापसाची खरेदी सुरू केली. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील पणन महासंघाचे केंद्र सुरू नसल्याने जिल्हाभरातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत आहेत. दररोज ८०० ते ९०० वाहने यार्डात दाखल होत असून, १० हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे.
चार दिवस सीसीआयची खरेदी राहणार बंद
१० ते १४ डिसेंबरपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात होणारी सीसीआयची खरेदी बंद राहणार आहे. याबाबत बाजार समितीकडून प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तालुक्यातील, तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी १० ते १३ डिसेंबरपर्यंत कापूस विक्रीसाठी आणू नये असे आवाहन सभापती पंकज आंबेगावकर, सचिव शिवनारायण सारडा यांनी केले आहे.