‘सीसीआय’ने कापूस खरेदीवर घातली मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:32+5:302021-01-02T04:14:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मानवत : ‘सीसीआय’ने केंद्रावर कापूस खरेदी संदर्भात मर्यादा घालून दिली आहे. मानवत केंद्रासाठी दररोज ६ हजार ...

CCI limits cotton procurement | ‘सीसीआय’ने कापूस खरेदीवर घातली मर्यादा

‘सीसीआय’ने कापूस खरेदीवर घातली मर्यादा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मानवत : ‘सीसीआय’ने केंद्रावर कापूस खरेदी संदर्भात मर्यादा घालून दिली आहे. मानवत केंद्रासाठी दररोज ६ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्याचे आदेश सीसीआयने केंद्रप्रमुखांना दिले आहेत. म्हणजेच दिवसाला फक्त ३०० वाहनेच खाली होणार आहेत. यामुळे हमीदराने कापूस विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या यार्डात आल्यानंतर शेतकऱ्यांना ‘वेटिंग’वर थांबावे लागणार आहे.

खासगी बाजारात कापसाला कमी भाव मिळत असल्याने तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकरी आपला कापूस हमीदराने विक्री करण्यावर ठाम होते. सीसीआयने २० नोव्हेंबरपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हमीदराने कापूस खरेदीला सुरुवात केली. मानवत येथील केंद्रावर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील शेतकरीही आपला कापूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याने दररोज १ हजार वाहने दाखल होत होती. यापैकी दररोज ६०० वाहनांमधील कापसाची खरेदी केली जात होती. त्यामुळे दररोज १३ हजार क्विंटल कापसाची आवक बाजार समितीकडे नोंद झाली. महिन्याभरातच ११ हजार ५४२ शेतकऱ्यांच्या २ लाख ८२ हजार २०९ क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली. मात्र, आता सीसीआयने कापूस खरेदी संदर्भात मर्यादा घातली आहे. मानवत केंद्रावर दररोज ३०० वाहने म्हणजेच दररोज फक्त ६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करावी, असे आदेशच सीसीआयने केंद्रप्रमुखांना काढले आहेत. यासंदर्भात मानवत सीसीआयचे केंद्रप्रमुख एस. गलगठ यांच्याशी संपर्क साधला असता, खरेदी मर्यादेचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.

५ जानेवारीपासून खरेदी सुरु

येथील बाजार समितीच्या यार्डात सीसीआयमार्फत सुरू असलेली कापूस खरेदी करार केलेल्या जिनिंगमध्ये जागा शिल्लक नसल्याने सीसीआयने २४ डिसेंबरपासून कापूस खरेदी बंद केली होती. आता ५ जानेवारीपासून खरेदी पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली. यार्डात कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर संगणकीकृत प्रवेश पत्रिका घेऊनच यार्डात आपली वाहने रांगेत उभी करावीत तसेच कापूस विक्री करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांनी सोबत आणावीत, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य

सीसीआयने कापूस खरेदी संदर्भात मर्यादा घालून दिल्याने दररोज मर्यादीतच कापूस खरेदी होणार आहे. यामुळे केवळ मानवत तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस महिनाभर खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती बाजार समितीने दिली.

सीसीआयला कापूस विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी बँक पासबुक, आधारकार्ड, सातबारा, रेशनकार्ड, यांची सत्यप्रत सोबत आणावी. तसेच ४० क्विंटलपेक्षा जास्त कापूस विक्रीसाठी आणू नये.

- पंकज आंबेगावकर, सभापती, कृउबा, मानवत

Web Title: CCI limits cotton procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.