सीसीआयची ५ दिवसांनंतर पुन्हा कापूस खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:51+5:302020-12-17T04:42:51+5:30
सेलू येथे १९ नोव्हेंबरपासून सीसीआयकडून शहरातील कापूस जिनिंगवर खरेदी सुरू करण्यात आली आहे. किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी ...
सेलू येथे १९ नोव्हेंबरपासून सीसीआयकडून शहरातील कापूस जिनिंगवर खरेदी सुरू करण्यात आली आहे. किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीसाठी मोठी गर्दी केली होती. सीसीआयकडून चांगला भाव मिळत असल्याने अवघ्या १५ दिवसांत ९ केंद्रांवर दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. सीसीआयने मनजित, ग्लोबल, मधुसूदन, माऊली, बीबीसी, समर्थ, वालूर येथील तिरुपती तर देवगाव फाटा येथील सुप्रिया या ९ केंद्रांवर खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने १० डिसेंबर रोजी तात्पुरती कापूस खरेदी बंद केली होती. त्यामुळे शहरातील बाजार समीतीच्या कापूस यार्ड परिसरात कापूस विक्रीसाठी सुमारे ८०० वाहने उभे होती. परिणामी शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. मात्र, जिनिंगमध्ये जागा उपलब्ध होताच मंगळवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. पाच दिवस सीसीआयची कापूस खरेदी बंद झाल्याने किरकोळ बाजारात कापसाचे दर पडले होते. दरम्यान, सीसीआयची पुन्हा कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, मंगळवारी सात हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती.
सीसीआयकडून १ लाख ७० हजार क्विंटल कापसाची खरेदी
किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी सीसीआयकडे कापूस विक्री करत आहेत. एक महिन्यात तब्बल एक लाख ७० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.