सेलूत सीसीआयची कापूस खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:36+5:302020-12-11T04:43:36+5:30
सेलू: येथे सीसीआयच्या वतीने खरेदी करण्यात आलेला कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात गुरुवारपासून खरेदी बंद करण्यात आली ...
सेलू: येथे सीसीआयच्या वतीने खरेदी करण्यात आलेला कापूस ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात गुरुवारपासून खरेदी बंद करण्यात आली आहे. या केंद्राबाहेर जवळपास ८०० वाहने कापूस घेऊन काट्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता पुढील खरेदी कधी सुरू होईल, हे अनिश्चित असल्याने वाहनांच्या किरायाचा भूर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
सेलू येथे सीसीआयच्या वतीने १९ नोव्हेंबरपासून एका खाजगी जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरु करण्यात आली आहे. कापसाला चांगला भाव मिळाल्याने १५ दिवसांत तालुक्यातील ९ केंद्रांवर तब्बल दीड लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली. या नऊही खरेदी केंद्रांची साठवणूक क्षमता संपली आहे. त्यामुळे खरेदी केलेला कापूस ठेवण्यास जागा नाही. त्यामुळे तूर्त कापूस खरेदी बंद केली आहे. जागा उपलब्ध होताच पुन्हा कापूस खरेदीस प्रारंभ केला जाईल, असे सीसीआयच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, या कापूस खरेदी केंद्राबाहेर कापूस घेऊन शेतकऱ्यांची जवळपास ८०० वाहने उभी आहेत. या शेतकऱ्यांना एकीकडे काट्याची प्रतीक्षा लागली असताना दुसरीकडे कापूस खरेदी बंद झाल्याने कापूस घेऊन किरायाने आणलेल्या वाहनांचे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.
किरकोळ बाजारात कापसाचे दर कोळसले
कापसाची सीसीआयकडून खरेदी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी किरकोळ बाजारात धाव घेतली आहे. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी कापसाचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. सीसीआयकडून कापसाला ५ हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जातो. खाजगी बाजारात मात्र ५ हजार १०० ते ५ हजार १५० रुपये प्रतिक्विंटलने कापूस खरेदी करण्यात येत असल्याचे गुरुवारी दिसून आले.