परभणी जिल्ह्याच्या सर्व सीमा नाक्यांवर सीसीटीव्ही बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:09 AM2020-04-19T00:09:34+5:302020-04-19T00:10:02+5:30
जिल्ह्याच्या सीमांवरुन अनेक नागरिक प्रवेश करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आता सर्व तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या सीमांवरुन अनेक नागरिक प्रवेश करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर आता सर्व तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यातील सर्व सीमांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. असे असताना अनेक जण या सीमांवरुन पोलिसांना चकमा देऊन तसेच चोरट्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. असाच प्रवेश हिंगोली जिल्ह्यातील तरुणाने पुण्याहून ढालेगावमार्गे जिल्ह्यात केला होता. परभणीत हा तरुण त्याच्या बहिणीकडे आल्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याने केलेल्या तपासणीअंती तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे आतापर्यंत ग्रीनझोनमध्ये असलेला जिल्हा आॅरेंज झोनमध्ये गेला. सीमांवर कडक बंदोबस्त असता तर सदरील तरुणाला तेथेच अडविले गेले असते. या अनुषंगाने ‘लोकमत’ने १७ एप्रिल रोजी एका दिवसात जिल्ह्यात ३३० नागरिकांनी अनधिकृत प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्व सीमांवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तरीही अनेक नागरिक जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे यापुढे या सर्व सीमा नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच या सीमांवरील बंदोबस्त आणखी कडक केला जाईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
१५ सीमांवर नाकाबंदी पॉर्इंट
४जिल्हा सीमांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात जिल्ह्याच्या सीमांवरील १५ ठिकाणी नाकाबंदी पॉर्इंट लावण्यात आले असून या सर्व सीमा सील केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीही अनेक नागरिक मुंबई, पुणे, औरंगाबाद इ. जिल्ह्यातून जिल्हा हद्दीत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आता चोरून लपून जिल्ह्यात येणाºया व्यक्तीस त्याचे नातेवाईक किंवा इतरांनी आश्रय देऊन माहिती लपविल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोणीही बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना आश्रय देऊ नये, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
बाहेर जिल्ह्यातून मजुरांचे लोंढे सुरूच
४चारठाणा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली असताना देखील बाहेर जिल्ह्यांतून देवगाव फाटा येथील चेक पोस्ट चुकवून अजूनही मजुरांचे लोंढे जिल्ह्यात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास मजुराचा एक जथ्था चारठाणा फाटा येथून जात होता. त्यात ७ पुरुष, ४ महिला व २ लहान मुले होती. संबधितांची विचारपूस केली असता सदर मजूर हे हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे त्यांनी सांगितले. गावाचे नाव मात्र त्यांनी सांगितले नाही. काही जण जालना जिल्ह्यात कामाला आहेत, असे सांगत असले तरी काही जण पुणे येथून आल्याचे सांगत होते. सदर मजूर हे लॉकडाऊनमुळे आडकून पडले होते; परंतु, जवळचे पैसे संपले. त्यातच काम बंद पडल्याने रोजगारा अभावी उपासमार होत असल्याने पायी प्रवास करीत येथून जिंतुर मार्गे गावाकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत तहसीलदार सुरेश शेजूळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती नाही, असे सांगितले.
पथक कॅमेºयाच्या निगराणीत
देवगाव फाटा येथे नाकाबंदी पथक सीसीटीव्ही कॅमेºयाच्या निगराणीत असून या पथकाने दोन दिवसांमध्ये ४२ वाहनांमधील प्रवाशांना जिल्ह्याचा प्रवेश नाकारला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप आलापूरकर व महसूल विभागाचे किरण देशमुख यांनी दिली.