निराधार महिलेस मदत करून शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:11 AM2021-02-22T04:11:32+5:302021-02-22T04:11:32+5:30
परभणी : येथील शेक हॅण्ड ग्रुपच्या सदस्यांनी एका निराधार महिलेस तिच्या उपजीविकेसाठी पिठाच्या गिरणीची मदत देऊन अनोख्या पद्धतीने शिवजयंती ...
परभणी : येथील शेक हॅण्ड ग्रुपच्या सदस्यांनी एका निराधार महिलेस तिच्या उपजीविकेसाठी पिठाच्या गिरणीची मदत देऊन अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली आहे.
गरजू व गोरगरिबांना मदत करण्यसाठी सामाजिक बांधीलकी जपत शेक हॅण्ड ग्रुपने जिल्ह्यात काम सुरू केले आहे. महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आणि सण-उत्सवाचे औचित्य साधून सामाजातील गरजू महिलांना या ग्रुपच्या वतीने सातत्याने मदत केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीही याच पद्धतीने साजरी करण्यात आली. आडगाव रंजे येथील ध्रुपदाबाई बापूराव धोतरे यांना पिठाची गिरणी भेट देण्यात आली. आडगाव येथे ध्रुपदाबाई यांचे छोटेसे घर आहे. त्यांचा मुलगा बारावी, तर मुलगी दहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. स्वत: मजुरी करून त्या उदरनिर्वाह भागवितात. त्यांना उदरनिर्वाहासाठी साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शेक हॅण्ड ग्रुपच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑल इन वन असलेली पिठाची गिरणी त्यांना भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमास ग्रुपच्या ॲड. सुप्रिया पानसंबळ, दिवाकर जोशी, रोहिदास कदम, शोभा घुंगरे, नाईकवाडे, केशव खटिंग, शकुंतला छपरे, भरत भालेराव, रामेश्वर ढोणे, शिवाजी हंडगे, प्रताप चव्हाण, सिद्धेश्वर जाधव यांच्यासह शेक हॅण्ड फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
यापूर्वीही पुढे केला मदतीचा हात
शेक हॅण्ड ग्रुपच्या सदस्यांनी यापूर्वीदेखील अनेकांना व्यवसायासाठी मदत केली आहे. त्यात महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त गरजू ताईंना शेळी व पिल्लू मदत देण्यात आले होते. त्याचप्रमाणे दिवाळी, दसरा, विविध महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथीचे औचित्य साधून सातत्याने ग्रुपच्या वतीने मदतीसाठी पुढाकर घेतला जात आहे.