केंद्राची योजना; परभणीत कामकाज सुरु : ‘आयुष्यमान’साठी दीड लाख लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:24 AM2018-09-23T00:24:33+5:302018-09-23T00:25:42+5:30
केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.
आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत देशभरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविली जाणार आहे. या योजनेचे कामकाज जिल्ह्यात सुरु झाले असून जिल्हा प्रशासनाने एमईसीएसच्या सर्व्हेक्षणानुसार १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची योजनेसाठी आॅनलाईन नोंदणी करुन घेतली आहे. या योजनेंतर्गत १ हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्रत्येक कुटुंबाला आरोग्यासाठी प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. योजनेत समाविष्ट झालेल्या कुटुंबांना ई-कार्ड दिले जाणार असून देशभरातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये कुटुंबियांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सध्या राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित असून या जोडीलाच केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजनाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किरकोळ व मोठ्या आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती- जमातीचे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला प्रमुख असलेले कुटुंब या योजनेचे लाभार्थी असतील. तर शहरी भागामध्ये कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर लघु व्यवसाय करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक, सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, हॉटेल वेटर, मॅकेनिक, वीज तंत्री, धोबी, चौकीदार या वर्गातील कुटुंब योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
आजपासून जिल्ह्यात प्रारंभ
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा २३ सप्टेंबर रोजी देशभरात एकाच वेळी प्रारंभ केला जाणार आहे. भारत सरकारच्या वतीने झारखंड राज्यातील रांची येथे या योजनेचा प्रारंभ केला जाणार असून परभणी जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचे अधिकृत उद्घाटन केले जाणार आहे. लाभार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जावेद अथर यांनी केले आहे.
५ लाखांचे विमा संरक्षण
या योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या लाभार्थी कुटुंबियांना ५ लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. तसेच अशा कुटुंबातील सुमारे १ हजार १२२ आजारांवर देशातील कोणत्याही शासनमान्य रुग्णालयांमध्ये उपचार करुन दिले जाणार आहेत.