केंद्राचे पथक जिल्ह्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:08+5:302021-04-09T04:18:08+5:30
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने या संसर्गाची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाने विविध जिल्ह्यांमध्ये पथक नियुक्त केले आहे. हे ...
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने या संसर्गाची माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाने विविध जिल्ह्यांमध्ये पथक नियुक्त केले आहे. हे पथक जिल्हास्तरावर भेटी देऊन कोरोनाचा आढावा घेत आहे. परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी नागपूर येथील डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसीन ऑल इंडियाच्या असोसिएट प्रोफेसर डाॅ. रंजना सोळंकी आणि पाँडेचेरी येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. दिनेश बाबू एस. हे दोन अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण, त्याचप्रमाणे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आदी विषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा ही आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातील एकूण खाटांची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची माहिती या अधिकाऱ्यांनी घेतली. जिल्ह्यातील एकूण कोविड सेंटर्स आणि त्या ठिकाणी असलेल्या सुविधांची माहिती यावेळी घेण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, डॉ. दुर्गादास पांडे, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कोरोना केंद्रांना आज देणार भेटी
केंद्राच्या पथकातील दोन्ही अधिकारी जिल्ह्यात मुक्कामी असून, शुक्रवारी जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी करणार आहेत. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रांनाही भेटी देऊन आढावा घेणार आहेत. एकंदर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आणि केलेल्या उपाययोजना याबाबतचा आढावा या दौऱ्यामध्ये घेतला जाणार आहे. त्यानंतरच हे अधिकारी आपला अहवाल वरिष्ठांना सादर करतील.