परभणी जिल्ह्यासाठी कोरोनाचे सेंट्रलाईज्ड केंद्र; आयटीआयमध्ये १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:52 PM2020-10-30T18:52:02+5:302020-10-30T18:54:48+5:30
रुग्ण नसलेले केंद्र बंद करण्याचे धोरण प्रशासनाने आता स्वीकारले असून, जिल्ह्याच्या ठिकाणी एकच सर्व सुविधांनीयुक्त केंद्र निर्माण केले जाणार आहे.
परभणी : येथील आयटीआयला कोरोनाचे सेंट्रलाईज्ड केंद्र करण्याचा प्रयत्न होत असून, त्यादृष्टीने जिल्हाभरातील सुमारे १०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व सुविधांनी हे केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे अनेक कोरोना रुग्णालयात रुग्णांअभावी जवळपास सर्व बेड रिक्त आहेत. नवीन बाधित रुग्णांची संख्याही आटोक्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण नसलेले केंद्र बंद करण्याचे धोरण प्रशासनाने आता स्वीकारले असून, जिल्ह्याच्या ठिकाणी एकच सर्व सुविधांनीयुक्त केंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी सर्व ती तयारी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील कोविड केअर केंद्र बंद करण्यात आले आहेत. तसेच आयटीआय येथील केंद्र अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या केंद्रात १०० वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संशयित कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीपासून ते अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारापर्यंतच्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी आय.टी.आय.ची इमारत सेंट्रलाईज्ड केंद्र म्हणून विकसित होत आहे.
आयटीआय केंद्रात मिळणाऱ्या सुविधा
आयटीआय येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये आता जिल्हा कोरोना रुग्णालय, डेडीकेटेड कोरोना केअर हॉस्पिटल, कोरोना केअर सेंटर, कोविड ओपीडी, पोस्ट कोविड ओपीडी, फिजिओथेरपी, मानसिक आरोग्य केंद्र, होम आयसोलेशन आणि सारी वार्ड आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे रुग्णांसाठी भोजन व्यवस्था आणि सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. या ठिकाणी ८ पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
रुग्णांचे मानसिक पाठबळ वाढवा
कोरोना हा इतर आजारासारखाच सर्वसाधारण आजार आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक पाठबळ द्यावे. 3त्यांना वेगळी वागणूक देऊ नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.