सिझेरियनला फाटा; ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:10+5:302020-12-23T04:14:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जिंतूर : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात सिझेरियन टाळून ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती केली ...

Cesarean section; Natural delivery of 800 women | सिझेरियनला फाटा; ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती

सिझेरियनला फाटा; ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जिंतूर : येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात सिझेरियन टाळून ८०० महिलांची नैसर्गिक प्रसूती केली आहे. तर केवळ २० महिलांचे सिझेरियन करण्यात आले आहे.

महिलांची प्रसूती सिझेरियन पद्धतीने करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला असता येथील आकडेवारी सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. जिंतूर ग्रामीण रुग्णालयात जानेवारी ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत एकूण ८२० महिलांची प्रसूती झाली. त्यातील तब्बल ८०० महिलांची प्रसूती ही नैसर्गिक पद्धतीने झाली आहे, तर फक्त २० महिलांची प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली आहे. जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही अवघड बाब साध्य करून दाखवली आहे. प्रसूतीच्या वेळी अनेकदा बाळाचे डोके मोठे असणे, मूल आडवे असणे, रक्तदाब वाढला, मधुमेह असेल गर्भाशयाच्या तोंडावर गाठ असेल किंवा नाळ बाळाच्या मानेभोवती किंवा खाली सरकलेली असल्यास प्रसूतीत अडचण येते. त्यासाठी सिझेरियन करावे लागते.

जिंतूर प्रथम क्रमांकावर

जिल्ह्यातील ९ तालुक्यांच्या तुलनेत जिंतूर तालुक्याचे शासकीय आरोग्य संस्थेत महिलांची नैसर्गिक प्रसूती करण्याचे काम उत्कृष्ट ठरले आहे. सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका आणि त्यांना वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ही बाब साध्य झाली.

खासगी रुग्णालयांची माहिती देण्यास टाळाटाळ

जिंतूर तालुक्यात महिलांची प्रसूती करणारी ८ ते १० खासगी रुग्णालये आहेत. प्रत्येक खासगी रुग्णालयांना याबाबतची माहिती नगरपालिकेला देणे बंधनकारक आहे; परंतु फक्त दोन रुग्णालयांकडूनच याबाबतची माहिती न.प.ला देण्यात येते. उर्वरित रुग्णालयांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ चालविली आहे. याबाबत नगरपालिकेची भूमिकाही कठोर नाही.

ग्रामीण रुग्णालयाकडून गरोदर मातांची योग्य ती काळजी घेतली जाते. त्यांची नऊ महिन्यांपर्यंत रक्त, लघवी, सोनोग्राफी तपासणी मोफत केल्या जाते. तसेच त्यांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी मोफत रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात येते.

- डॉ. रविकिरण चांडगे

Web Title: Cesarean section; Natural delivery of 800 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.