सेलू बाजार समितीच्या सभापतीपदी चक्रधर पौळ तर उपसभापतीपदी प्रकाश मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 07:20 PM2023-05-20T19:20:57+5:302023-05-20T19:21:17+5:30
राष्ट्रवादी, काँग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडीने नियोजनबध्द निवडणुक लढवत बाजार समितीवर वर्चस्व निर्माण केले आहे.
सेलू : येथील बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे चक्रधर पौळ तर उपसभापतीपदी प्रकाश मुळे यांची आज निवड झाली.
नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीला १८ पैकी १० तर भाजपाला ६ जागा मिळाल्या होत्या. शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदासाठी निवडणुक निर्णय अधिकारी प्रशांत थारकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लोणीकर, सचिव राजीव वाघ यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
महाविकास आघाडीकडून चक्रधर पौळ व उपसभापती पदासाठी प्रकाश मुळे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले . तर भाजपकडून सभापती पदासाठी डॉ. संजय रोडगे तर उपसभापती पदासाठी प्रसाद डासाळकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यानंतर निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यात महाविकास आघाडीचे सभापतीपदाचे उमेदवार चक्रधर पौळ व उपसभापतीपदाचे उमेदवार प्रकाश मुळे यांना प्रत्येकी बारा मते मिळाली. तर भाजपाचे उमेदवार डाॅ. रोडगे व डासाळकर यांना प्रत्येकी सहा मते मिळाली.
दरम्यान, व्यापारी मतदार संघातील दोन्ही अपक्ष संचालकांनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना मतदान केले. महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी भाजप च्या दोन्ही उमेदवारांचा १२ विरूध्द ६ मताने पराभव केला. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुक होताच महाविकास आघाडीतील संचालक सहलीवर गेले होते. मतदानाच्या दिवशी हे सर्व संचालक थेट सभागृहात दाखल झाले. व बाजार समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले.
उपसभापतीपदाची मुळे यांना लाॅटरी
महाविकास आघाडी कडून अगोदरच सभापती पदासाठी चक्रधर पौळ यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र उपसभापदासाठी सस्पेन्स शेवटपर्यंत होता. ऐन वेळेस प्रकाश मुळे यांना संधी देण्यात आली.
महाविकास आघाडी मजबूत
बाजार समितीची निवडणूकीत भाजप आमदार मेघना बोर्डीकर, माजी रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेना यांची महाविकास आघाडीने नियोजनबध्द निवडणुक लढवत बाजार समितीवर वर्चस्व निर्माण केले आहे.
निवडीनंतर जल्लोष
महाविकास आघाडीचे चक्रधर पौळ व प्रकाश मुळे यांची निवडीची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा करत सवाद्य शहरातून मिरवणूक काढण्यात आली.