शेतकाऱ्यांनो शेतमाल सुरक्षित ठेवा, मराठवाड्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:14 PM2024-01-10T15:14:50+5:302024-01-10T15:15:06+5:30
पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज
परभणी : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच मराठवाड्यात ढगाळ वातावरण होते. यामध्ये धाराशिव, बीड व परभणी जिल्ह्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात दोन दिवसांत किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व ११ जानेवारीला किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात १२ ते १८ जानेवारीदरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात १४ ते २० जानेवारीदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला वनामकृवि ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिला आहे.
रिमझिम पावसाची हजेरी
परभणी तालुक्यातील दैठणा परिसरात सायंकाळी सात वाजता काही वेळ रिमझिम पावसाची हजेरी लावली. जिल्ह्यात अन्य कोठेही पाऊस नव्हता. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक हलकासा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.