'चंदाराणी मी तुझ्याकडे येतोय';पत्नी विरहात स्टेट्स अपडेट करत पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:31 PM2020-03-09T18:31:07+5:302020-03-09T18:32:40+5:30
एक महिन्यांपूर्वी अपघातात पत्नीचा झाला मृत्यू
गंगाखेड: 'चंदाराणी मी तुझ्याकडे येतोय' असे स्टेटस सोशल मीडियात अपडेट करून अपघाती निधन झालेल्या पत्नीच्या विरहात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ९) सकाळी ९. ३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सार्थक संजय बचाटे ( २५ ) असे मृताचे नाव असून ही घटना वडगाव स्टेशन (ता. सोनपेठ) शिवारात घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सार्थक संजय बचाटे हे पत्नी चंदा (२० ) सोबत गंगाखेडपासून जवळच असलेल्या वडगाव स्टेशन येथे राहत असत. १० फेब्रुवारीस सार्थक पत्नी चंदासोबत गंगाखेड येथून गावी वडगाव स्टेशनकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी झालेल्या अपघातात चंदा यांचा मृत्यू झाला. या घटनेपासून सार्थक मानसिक तणावात होते. आज सकाळी घराबाहेरील शेतात त्याने गळफास घेतला. दरम्यान, सकाळी ८:५३ वाजता सार्थक याने सोशल मिडीयावर पत्नीच्या नावे चंदाराणी मी तुला भेटायला यायलो असे स्टेट्स अपडेट केले. तसेच पत्नीसोबतचे काही फोटो आणि 'आई, पप्पा, ताई, दाजी मला माफ करा. मी जायलो, भावांनो तुम्हाला आज सोडून जायलो, माझ्या मरणाला कोणीही जबाबदार नाही' असे स्टेटसही अपडेट केल्याचे आढळून आले आहे.
सोशल मिडीयातील स्टेट्स मोबाईलवर पाहून सार्थकचे मित्र व नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली. सार्थक शेतात गेल्याचे समजताच सर्वांनी तिकडे धाव घेतली. यावेळी सार्थक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सार्थकचे चुलते जयप्रकाश हरिभाऊ बचाटे यांनी मित्र, नातेवाईक व ग्रामस्थांच्या त्याला तत्काळ गंगाखेड रुग्णालयात दाखल केले. मात्र निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेबद्दल वडगाव स्टे. येथे हळहळ व्यक्त केली जात होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून याचा पुढील तपास सपोनि राजेश राठोड करीत आहेत.