‘माझी मैना गावावर...'; प्रसिद्ध गीताचे विडंबन केल्याने संगीतकार 'अजय-अतुल'विरूद्ध पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 03:15 PM2021-04-12T15:15:59+5:302021-04-12T15:21:01+5:30
Police Complaint against musician Ajay-Atul : अत्यंत वाईट हेतूने ही छेडछाड आणि बदल केला असून यामुळे अण्णा भाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा, मराठी भाषकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे.
परभणी: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या गीतातील मुळ रचनेत बदल करून चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करून भावना दुखावल्या प्रकरणी संगीतकार, गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्याविरूद्ध शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
परभणी येथील लालसेनेचे प्रमुख गणपत भिसे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढणाऱ्या आंदोलकांच्या कार्यकक्षा अधोरेखित करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी ‘माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली’ ही छक्कड लिहिलेली आहे. म्हणजे निपणी, बेळगाव, कारवार हा भूभाग मराठी भाषकांचा असून महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. त्या शिवाय संयुक्त महाराष्ट्राचे आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार नाही, म्हणून आताचा जो महाराष्ट्र आहे, तो संयुक्त नाही. कारण काही मराठी भाषा प्रदेश कर्नाटकात अडकून पडलेला आहे. त्यासाठी या छक्कडमध्ये अण्णा भाऊ साठे यांनी ‘बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ असे लिहिले असताना मुळ रचनेत बदल करून संगीतकार, गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी संदीप लिरिक्स वर्ल्ड या युट्युब चॅनलवर ‘वेणी माळायची अजून राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ असे गाऊन छक्कड प्रकारात मोडणाऱ्या गीताचा संपूर्ण अर्थ बदलून टाकला आहे. ‘बिनी मारायची अजून राहिली..’ म्हणजे घाव घालायचा अजून बाकी आहे, अशा आशयाच्या गीताला ‘वेणी माळायची अजून राहिली...’ असा बदल केला आहे.
वेणी माळण्याचा अर्थ म्हणजे सुहागरात किंवा शारिरीक संबध या अर्थाने निघत असल्यामुळे गीताचा संपूर्ण अर्थ आणि आशय बदलला आहे. अत्यंत वाईट हेतूने ही छेडछाड आणि बदल केला असून यामुळे अण्णा भाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा, मराठी भाषकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. यामुळे आमच्या व समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी संदीप लिरिक्स वर्ल्ड हे युट्युब चॅनल चालवणारा व्यक्ती, संगीतकार, गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भिसे यांनी या तक्रारीत केली आहे. या अनुषंगाने नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर टाक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही तक्रार चौकशी करण्यासाठी फौजदार गायकवाड यांच्याकडे दिली असल्याचे सांगितले.