रेल्वेस्थानक, बसस्थानकासह सीमा हद्दीवरही तपासणीला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:42+5:302021-03-19T04:16:42+5:30
महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना शोधून काढण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी स्वॅब तपासणी ...
महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना शोधून काढण्यासाठी प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी स्वॅब तपासणी सुरू केली आहे. परंतु, प्रत्यक्षात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होत नसल्याची बाब गुरुवारी केलेल्या पाहणीत दिसून आली. शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर तपासणी केंद्र नसल्याने बाहेरगावाहून आलेले प्रवासी विनातपासणीच शहरात दाखल होत होते. असाच प्रकार विदर्भ-मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या येलदरी येथेही दिसून आला. या ठिकाणीदेखील तपासणी नसल्याने कोरोना रोखायचा कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे.
शहरी भागात वाढविली केंद्रांची संख्या
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. परभणी महानगरपालिकेने शहरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी गांधी पार्क, शिवाजी चौक, सिटी क्लब येथे केंद्र वाढविले आहेत.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागनेदेखील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाची तपासणी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही येणाऱ्या विविध आजारांच्या रुग्णांची प्राधान्याने कोरोना चाचणी केली जात असून, त्यानंतरच उपचार केले जात आहेत.
दुसरीकडे नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. मनपा, नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून दररोज पथके स्थापन करून मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला जात आहे.
पर जिल्ह्यातील प्रवासी थेट शहरात
प्रशासनाने काही दिवसांपूर्वी नांदेड आणि औरंगाबाद येथील बससेवा बंद केली असली तरी इतर जिल्ह्यातून विनातपासणी नागरिकांचा प्रवेश होतो.
बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु, या ठिकाणी अजूनही कोरेाना तपासणी केंद्र सुरू केले नाही. स्थानक परिसरात अनेक जण मास्कचा वापर करीत नाहीत. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत असल्याने धोका वाढला आहे.
रेल्वेस्थानकावरील तपासणी गुंडाळली
येथील रेल्वेस्थानकावर सुरुवातीचे काही दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्रवाशाची तपासणी सुरू केली होती.
सात-आठ दिवस हे तपासणी केंद्र चालविण्यात आले. सायंकाळनंतर हे केंद्र मध्यंतरी बंद ठेवण्यात आले.
मागील दोन दिवसांपासून मात्र रेल्वेस्थानकावर तपासणीच होत नाही. त्यामुळे प्रवाशांचा विनातपासणी प्रवेश होत आहे.
रात्रीच्या वेळी तपासणी बंद
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे चेकपोस्ट उभारला आहे. या ठिकाणी दिवसा तपासणी होत आहे.
चेकपोस्टवर आरोग्य कर्मचाऱ्याची नियुक्ती केली असून, केवळ विदर्भातून येणाऱ्या वाहनांमधील नागरिकांची तपासणी केली जाते.
मात्र सायंकाळी ७ नंतर या ठिकाणी विजेची व्यवस्था नसल्याने तपासणी बंद असून, रात्रीच्या वेळी वाहनधारकांना खुला प्रवेश मिळत आहे.