परभणी जिल्ह्यातील १४ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:13 PM2018-04-26T19:13:41+5:302018-04-26T19:13:41+5:30
पोलीस दलामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मंजूर झाले आहे़
परभणी : पोलीस दलामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मंजूर झाले आहे़ या कर्मचाऱ्यांना १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर सन्मानित केले जाणार आहे़
महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलाच्या वतीने राज्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो़ प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक, पोलीस पदक, शौर्य पदक तसेच पोलीस महासंचालकांचे बोध चिन्ह, सन्मानचिन्ह प्रदान केले जाते़ पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी राज्यातील ५७१ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानपदक २२ एप्रिल रोजी एका आदेशान्वये जाहीर केले आहे़ सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादीही प्रसिद्ध केली आहे़
परभणी जिल्ह्यातील १४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे़ यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्मान चाँद शेख, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादू मालसमिंदर, आर्थिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे, वाहतूक शाखेतील हवालदार कुंडलिक राठोड, पूर्णा पोलीस ठाण्याचे हवालदार मक्सूद अहमद खान पठाण, पोलीस मुख्यालयातील हवालदार सय्यद चाँद सय्यद इब्राहीम, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे हवालदार संजय वळसे, पोलीस नियंत्रण कक्षातील चंद्रशेखर बावीसकर, सेलू पोलीस ठाण्याचे राजेश जाधव, ताडकळस पोलीस ठाण्याचे शेख मुजीब शेख सादेक, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील शेख शकील अहमद शेख सलीम अहमद, नरेश सिरसकर, नागरी हक्क संरक्षक विभागाचे संभाजी ताल्डे आणि लाचलुचपत प्रतिबंक विभागातील जमीलोद्दीन मोईनोद्दीन जहागीरदार या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़
पोलीस अधीक्षकांकडून कौतुक
२०१७ या वर्षांत प्रशंसनीय सेवेबद्दल जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मंजूर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक दिलीप झळके आणि अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे़