बापाचा खून केल्याप्रकरणी मुलास पाच दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:46+5:302021-06-18T04:13:46+5:30
तालुक्यातील हिस्सी येथील परमेश्वर गायके यांच्या १४ जून रोजी झालेल्या मृत्यूप्रकरणी दोन वेळा अंत्यसंस्कार झाल्याने संशय निर्माण झाला होता. ...
तालुक्यातील हिस्सी येथील परमेश्वर गायके यांच्या १४ जून रोजी झालेल्या मृत्यूप्रकरणी दोन वेळा अंत्यसंस्कार झाल्याने संशय निर्माण झाला होता. सेलू पोलिसांनी १५ व १६ जून रोजी घटनास्थळी पंचनामा करून परमेश्वर गायके यांच्या मुलाचे जबाब नोंदविले. तेव्हा वडील दारूचे व्यसन सोडत नव्हते व घरातील मंडळींसोबत नेहमी भांडत असत. असेच भांडण घटनेच्या दिवशी सुरू असताना रागाच्या भरात मी वडिलांना लाकडाने मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. प्रकरण दडपण्यासाठी त्यांचे अंत्यसंस्कार घाईघाईने केले; परंतु मृतदेह अर्धवट जळाल्याने पुन्हा अग्नी दिला, अशी कबुली परमेश्वर गायके यांचा मुलगा हनुमान गायके याने दिली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात खून करणे व पुरावा नष्ट करणे या आरोपांवरून बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपी हनुमान गायके यास गुरुवारी सेलू न्यायाधीश एस.एम. चव्हाण यांच्यासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपीस २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी दिली.