बाल वैैज्ञानिकांचा शेती, पर्यावरणपूरक प्रयोगांवर भर
By Admin | Published: September 30, 2016 01:09 AM2016-09-30T01:09:19+5:302016-09-30T15:31:32+5:30
उस्मानाबाद : येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित इन्स्पायर अॅवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शेती उपयोगी, पर्यावरणपूरक,
उस्मानाबाद : येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित इन्स्पायर अॅवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शेती उपयोगी, पर्यावरणपूरक, सौर ऊर्जेचा वापर आदी विविध विषयावरील प्रकल्पांचे सादरीकरण केले़ विशेषत: कमी खर्चात चांगले प्रयोग तयार करून त्याचा दैैनंदिन जीवनात होणारा वापर, ही विद्यार्थ्यांनी केलेली संकल्पना आणि त्यातून सादर झालेले प्रयोग अनेकांचे लक्ष वेधून घेत होते़
भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने येथील तेरणा पब्लिक स्कूलमध्ये २९ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या कालावधीत जिल्हास्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ याचे उद्घाटन माजी आमदार सि. ना. आलुरे गुरूजी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सभापती हरिष डावरे, जि.प.चे माजी अध्यक्ष एस. एल. पाटील, अनंत उंबरे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, संजय राठोड, उपशिक्षणाधिकारी शिवदास नलावडे, रमेश जोशी, रोहिणी कुंभार यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आलुरे गुरूजी म्हणाले की, विद्यार्थ्यांतील गुण शिक्षकांनी जाणून घेतले तर निश्चितपणे यश मिळू शकते. विद्यार्थ्यांनी स्वत:ला कमी लेखू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात अॅड. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी बाळगल्यास यश सहज संपादन करू शकतात असे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणे झाली.
प्रदर्शनादरम्यान, तेरखेडा येथील गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘सोलार वॉटर हिटर’ हा टाकाऊ बाटल्या, काच आणि वाळूपासून निर्मित केलेल्या प्रयोगाचे सादरीकरण केले होते़ सौर ऊर्जेचा वापर करून पाणी गरम करण्याची संकल्पना यातून मांडण्यात आली होती़ जुनोनी येथील पांडुरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऊर्जाबचतीचा सादर केलेला प्रयोगही अनेकांना आकर्षित करून गेला़ तर कुक्कडगाव येथील कल्याणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वायूप्रदुषण रोखण्यासाठीचा प्रयोग सादर केला आहे़ बोरगाव (दु़) येथील राजीव गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जल विद्युत ऊर्जा केंद्र प्रयोग सादर केला़ पडत्या पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती करण्याचा हा प्रयोग आहे़ महाड येथील पूल दुर्घटनेचाही प्रभाव या प्रदर्शनावर दिसून आला़ एखादा पूल खराब झाला किंवा पडला तर चालकांना कशी सूचना मिळेल ? याचा विचार करून अनेक शाळांनी पूलाच्या संरक्षणाबाबत प्रयोग सादर केले होते़ यात कुक्कडगाव येथील कल्याणी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खराब पुलाबाबत तर आरळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पूर सूचकाबाबत प्रयोग सादर केले आहेत़ (प्रतिनिधी)