धक्कादायक ! जिंतूरमध्ये क्वारंटाईन कुटुंबातील बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:52 PM2020-05-19T17:52:52+5:302020-05-19T17:53:22+5:30
चारठाणा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक सोस येथे दाखल झाले असून, गावात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे.
जिंतूर (जि. परभणी) : पुणे येथून गावाकडे परतलेल्या व क्वारंटाईन केलेल्या कुटुंबातील दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी दुपारी ३ वाजता तालुक्यातील सोस येथे घडली.
सोस येथील एक कुटुंब पुणे येथून मोटारसायकलने गावात पोहोचले. त्यानंतर १४ मे रोजी या कुटुंबियांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्वारंटाईन केले होते. दोन दिवस शाळेत राहिल्यानंतर या कुटुंबियाने घरी क्वारंटाईन होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार हे कुटुंबिय त्यांच्या घरीच क्वारंटाईन झाले होते. १८ मे रोजी या कुटुंबातील दोन वर्षाच्या बालकाची प्रकृती अस्वस्थ असल्याची बाब त्याच्या आईच्या लक्षात आली. त्यानंतर जोगवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या बालकावर प्रथोमपचार करुन त्यास जिंतूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून बालकास मृत घोषित केले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, मृत बालकासह त्याच्या आई-वडिलांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. चारठाणा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक सोस येथे दाखल झाले असून, गावात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मयत मुलाचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला असून त्याच्या अहवालानंतरच मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी महिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे यांनी दिली.