तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; दीड एकरात लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 02:38 PM2023-07-05T14:38:09+5:302023-07-05T14:39:02+5:30
वेगळा प्रयोग करत शेतकऱ्याने कमी जागेत, कमी गुंतवणीत चांगले उत्पादन घेतले
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी) : तरुण शेतकरी आता शेतीमध्ये बदल करू लागले आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक प्रयोगाची कास धरून अनेक शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. असाच वेगळा प्रयोग करत तालुक्यातील वाघाळा येथील तरुण शेतकऱ्याने सहा महिन्यातच मिरची पिकाने लखपती बनवलं. तिखट मिरचीने या शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगलाच गोडवा निर्माण केल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे.
पाथरी तालुक्यातील वाघाळा गावातील 28 वर्षीय शेतकरी ऋषिकेश घुंबरे याचे वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. त्यामुळे १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर ऋषिकेश आईला मदत करण्यासाठी शेतीकडे वळला. अनेक वर्षांपासून १० एकर बागायती शेतीत पारंपरिक पद्धतीने उसाचे पीक घेतले जात असे. मात्र त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते.
दरम्यान, काही तरी वेगळे पिक शेतात घेण्याचा विचार ऋषिकेश करत होता. काही प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेत त्याने २५ डिसेंबर 2022 रोजी दीड एकर शेतात शार्क १ वाणाच्या मिरचीची लागवड केली. हे वाण लाल मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. लागवडीनंतर काही महिन्यांतच मिरची तोडणी सुरु झाली. आतापर्यंत ३४ क्विंटल हिरवी मिरची विक्रीतून १ लाख २ हजार रुपये तर ११ क्विंटल वाळवलेल्या लाल मिरचीला २५० रुपये प्रती किलो दर मिळून २ लाख ७५ हजार रुपये असे ३ लाख ७७ हजारांचे उत्पन्न आतापर्यंत मिळाले आहे. पावसाळा असल्याने हिरव्या मिरचीची आणखी तोडणी होणार आहे. लागवडीनंतर साधारण १५ महिने हे पिक शेतात उत्पादन देत राहते. अवघ्या दीड एकरातील तिखट मिरचीने या शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र गोडवा निर्माण केल्याने सुगीचे दिवस आले आहेत.
अशी केली लागवड व देखरेख ...
२५ डिसेंबर २०२२ रोजी शेताची पूर्व मशागत करत ४ बाय १ अंतराने मल्चींग केलेल्या बेडवर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून शार्क १ या मिरची वाणाची १५ हजार रोपे लागवड केली . यात २ हजार रोपांची तुट झाली तर त्यातील १३ हजार रोपे जीवंत राहीले .प्रारंभी बेडमध्ये शेणखतासह सुपर फॉस्फेट १ क्विंटल , निमपेंड १ क्विंटल , पोटॅश ५० किलो , मायक्रोन्युट्रीएन्ट १५ किलो रासायनिक खत मातील मिसळून दिला . आतापर्यंत किड व बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशक व पिप्रोनील च्या ५ फवारण्या केल्या आहेत . उन्हाळ्यात गरजेनुसार पाणी दिले. मिरची तोडणी मजुरांकडून करून घेतली. तोडणीसाठी प्रती किलो दहा रुपये एवढा खर्च आला आहे .
चांगले उत्पादन मिळाल्याचे समाधान
वडिलोपार्जित शेतीत सातत्याने उसाचे पीक घेण्यात आल्याने जमिनीचा पोत कमी होऊन उत्पादनामध्ये कमालीची घट झाली होती. यामुळे प्रयोगशील शेतकरी माझे मामा दिलीपराव साबळे यांनी मिरची लागवड करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वी झाला. सध्या वाळलेल्या मिरचीला २७० रुपये किलोप्रमाणे मागणी आहे. आणखी काही दिवस चांगले उत्पादन मिळेल.
- ऋषिकेश घुंबरे, प्रयोगशील शेतकरी, वाघाळा ता पाथरी